पर्वरी / प्रतिनिधी
भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसरा कसोटी क्रिकेट सामन्यासाठी लावण्यात येत असलेल्या ऑन लाईन बेटिंगचा पर्वरी पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी सट्टा घेणाऱया आठ जणांना अटक करून शनिवारी वैयक्तिक दहा हजार रुपयांच्या हमीवर सोडण्यात आले.तसेच त्यांच्या कडून 40 मोबाईल, 3 लॅपटॉप आणि इतर एकूण दहा लाखांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. पर्वरी पोलीस स्थानकात नुकतेच रुजू झालेले उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांनी ही धडक कारवाई केली. याबद्दल त्यांचे पर्वरीतील रहिवाशांकडून कौतुक होत आहे.
या संबंधीचे सविस्तर वृत्त असे की, भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी क्रिकेट सामना शुक्रवारी सुरु असताना येथील डिफेन्स कॉलोनीतील एका घरात ऑन लाईन बेटिंग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली त्या घरावर धाड घालण्यात आली. या धाडीत शुभांकर पांडे (22,उत्तर प्रदेश), नवीन जैन (दिल्ली), अंकित मौर्य (उत्तर प्रदेश), मोहन कुमार (उत्तर प्रदेश), सूरज शाह (दिल्ली), गौतम कुमार (पश्चिम बंगाल), जयदेव कुमार (त्रिपुरा),दीपक डांग (दिल्ली) या आठ जणांना रंगेहात पकडून त्यांना अटक केली. तसेच त्यांचाकडून चाळीस मोबाईल, तीन लॅपटॉप आणि इतर साहित्य मिळून एकूण दहा लाखांच्या वस्तू जप्त केल्या.
या धडक कारवाईत पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतिक भट,उपनिरीक्षक सीताराम मळीक, हवालदार संदीप परब, महादेव नाईक यांनी केली.








