शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार – सहावी ते नववीपर्यंतच्या परीक्षेबाबत बैठकीत चर्चा
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात का? परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा का?, याबाबत दोन दिवसात सरकार निर्णय घेणार आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.
कोरोना संसर्गवाढीमुळे राज्य सरकारने शनिवारपासून विद्यागमसह सहावी ते नववीपर्यंतचे वर्ग स्थगित केले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घ्यावी का, याबाबत सोमवारी शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी, पालक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षण संघटनेचे पदाधिकारी आणि खासगी शाळा व्यवस्थापन मंडळांच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन मते जाणून घेतली.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परीक्षेसंदर्भात अनेकांनी बैठकीत आपापली मते मांडली आहेत. शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी पुन्हा एकदा बैठक घेणार असून दोन दिवसांत सरकार स्पष्ट निर्णय घेणार आहे. राज्यात सहावी ते नववीपर्यंतचे वर्ग 20 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आल्याने परीक्षा होणार का? किंवा परीक्षेविना उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश मिळणार?, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, पालक संघटना, शिक्षण तज्ञांशी चर्चा करून आपण त्यांची मते जाणून घेतली आहेत, असे ते म्हणाले.
खासगी शाळा संघटना, विद्याभारतीच्या प्रतिनिधींनी मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावे, असे मत व्यक्त केले आहे. शिक्षणतज्ञ निरंजनाराध्य यांच्यासह इतरांनी शिक्षण कायद्याच्या आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा असणारा अधिकार वापरण्याचा सल्ला दिला आहे. तर काही जणांनी शाळा बंद असताना टय़ूशन (शिकवण्या) सुरू असल्याबाबतचा मुद्दा मांडला आहे. त्यामुळे या सर्वांचा विचार करून दोन दिवसांत निर्णय स्पष्ट करण्यात येईल, असेही सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले.









