प्रतिनिधी/ चिकोडी
केएसआरटीसी, बीएमटीसी, एनडब्ल्यूकेआरटीसी व एनईकेआरटीसीच्या सर्व कर्मचाऱयांना सरकारी कर्मचाऱयांचा दर्जा मिळावा या मागणीसाठी वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या नोकर संघटनेद्वारे प्रांताधिकाऱयाद्वारा मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले.
या निवेदनात अखिल कर्नाटक परिवहन नोकर महामंडळ चिकोडी विभाग, अनुसूचित जाती जमातीचा नोकर संघ चिकोडी विभाग, अनुसूचित जाती-जमाती अधिकारी व नोकर क्षेमाभिवृद्धी संघ चिकोडी, वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळ कन्नड क्रीडा समिती चिकोडी विभाग व भारतीय मजदूर संघ आदींनी संयुक्तरित्या हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळात गेल्या अनेक दशकांपासून सेवा बजावून लाखो प्रवाशांना अनुकूलता मिळवून देण्याबरोबरच आजच्या खासगी वाहनसंस्थांशी स्पर्धा करून उत्तम सेवेसह सरकारला चांगले उत्पन्न मिळवून देण्यात या कर्मचाऱयांचा मोठा वाटा आहे. पण या कर्मचाऱयांना त्यांच्या सेवेअनुरुप वेतन तसेच सरकारी सुविधा मिळत नाहीत. या सुविधापासून संस्थेतील 1 लाख 30 हजार नोकरवर्ग व त्यांचे कुटुंबीय आज आर्थिकदृष्टय़ा अडचणीत असून मुख्यमंत्र्यांनी या सर्व कर्मचाऱयांना सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे दर्जा देऊन, सर्व सुविधा व सवलती द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी गोपाल बजंत्री, एम. एम. भोसले, सविता हळीजोळ, महादेवी संजूगोळ, सतिश रोगी, आनंद कांबळे, प्रकाश पात्रुट, दयानंद साने, मानसिंग राठोड, महादेव उदगट्टी, एस. एस. बजंत्री व सी. डी. बडिगेर यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.









