ऑनलाईन टीम/कोल्हापूर
राज्यभरात एसटीचा संप चिघळला असताना परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांचे एक पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रात सतेज पाटील हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसटी महामंडळाचे राज्यसरकार मध्ये विलीनीकरण करावे.अशी मागणी केली आहे. सतेज पाटील यांनी हे पत्र २५ डिसेंबर २०१८ रोजी लिहल्याचे नोंद आहे. दरम्यान, हे पत्र व्हायरल झाल्यानंतर सत्तेत नसताना एक भूमिका आणि सत्तेत आल्यानंतर वेगळी भूमिका घेत असल्याची भावना एसटी कर्मचाऱ्यांची झाली आहे.
काय आहे या पत्रात, राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दररोज लाखो प्रवाशांची वाहतुक केली जाते. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे राज्य परिवहन महामंडळाला दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे नुकसान सोसावे लागते. त्यांचा संचित तोटा वाढून २०० कोटी पर्यंत पोहचला असून दरवर्षी तो वाढतच आहे. राज्य परिवहन महामंडळाला भांडवली अंशदान म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून मदत केली जात आहे.
परंतू यामुळे पाहीजे तेवढा फायदा होत नसल्याने राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिन करण्यात यावे, तसेच दि.०१ जून २०१८ रोजी एकतर्फी जाहीर केलेल्या रु.४८४९ कोर्टीचा संपूर्ण मोबदला म्हणजेच उर्वरित रु.१५०० कोटी (दि.३१/०३/२०१६ च्या मुळ वेतनात रु.११९० कोटी) इतके मिळावे या प्रमुख मागण्यांबरोबर इतर मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना, मुंबई यांनी आपणांकडे सादर केले आहे. तरी या पत्राने आपणांस विनंती करणेत येते की, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना, मुंबई या संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनी करण करणे व इतर मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यांना न्याय मिळवून देणेकामी शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करुन सहकार्य करावे. असे या पत्रात नमूद आहे.










