अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत खळबळ; मास्क लावून केली पाहणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी दुपारी अचानक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात शासकीय प्रोटोकॉल टाळत पोलिस बंदोबस्ताविना अचानक भेट देऊन पाहणी केली. मास्क लावून मंत्री परब यांनी विविध विभागातील कामकाजाची माहिती घेतली. त्यामुळे प्रारंभी मंत्री महोदय कार्यालयात आल्याची कोणत्याही प्रकारची कल्पना अधिकारी, कर्मचाऱयांना नव्हती. मात्र हळूहळू माहिती मिळाल्यानंतर मात्र आरटीओ ऑफिसमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱयांची चांगलीच तारांबळ उडाली.
परिवहन मंत्री अनिल परब शुक्रवारी खासगी दौऱयासाठी कोल्हापुरात आले होते. सकाळी त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर ते मुंबईला जाणार होते. मात्र विमान नसल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा आरटीओ ऑफिसकडे वळवला. याठिकाणी जाताना त्यांनी सरकारी प्रोटोकॉल बाजूला ठेवला. केवळ शिवसेना शहर प्रमुख जयवंत हरूगले यांना बरोबर घेऊन त्यांनी आरटीओ कार्यालयातील विविध विभागांची पाहणी केली. एकदम साध्या वेशात आणि चेहऱयावर मास्क असल्यामुळे त्यांना कोणीही ओळखले नाही. ड्रायव्हिंग टेस्ट ड्राईव्हची त्यांनी पाहणी केली. तसेच विविध विभागात जाऊन सुरू असलेल्या कामकामाची माहिती घेतली. सर्व पाहणी झाल्यानंतर ते परिवहन अधिकारी विजय इंगोले यांच्या कक्षात गेले. इंगोले यांनी यापूर्वी मुंबईत काम केल्यामुळे मंत्री परब आणि त्यांची ओळख आहे.
इंगोले यांच्या कार्यालयात मंत्री परब असतानाच ते आले असल्याची माहिती आरटीओ कार्यालयात पसरली. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्यासह अन्य अधिकारी इंगोले यांच्या कक्षात दाखल झाले. यावेळी मंत्री परब यांनी अधिकाऱयांशी चर्चा करून त्यांना सूचनाही केल्या.
कार्यालयात नागरिकांची गर्दी आणि कागदाचे गट्टे का ?
आरटीओ कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी का झाली आहे?, त्यांच्या हातात कागदाचे गट्टे का आहेत?, त्यांची कामे वेळेवर होत नाहीत म्हणून गर्दी झाली आहे काय? अशी विचारणा मंत्री परब यांनी केल्यानंतर सर्व अधिकारी निरूत्तर झाले. त्यावर काहीसे नाराज झालेल्या परब यांनी आपण सर्व वसुलीसाठी नाही तर जनतेला सेवा देण्यासाठी आहोत, याची जाणीव ठेवून शासकीय काम करा, अशा शब्दात अधिकाऱयांना सुनावले.
नागरिकांसह रिक्षाचालक संघटनांनी दिले निवेदन
दरम्यान, मंत्री परब आल्याची माहिती आरटीओ ऑफिसच्या बाहेरही पसरली.उपस्थित नागरिकांसह काही रिक्षाचालक संघटनांच्या पदाधिकाऱयांनी मंत्री परब यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपले गाऱहाणे मांडले. तसेच मागण्यांचे निवेदनही त्यांना सादर केले.
परब यांच्या सूचनेची चांगलीच चर्चा
दरम्यान, आपण वसुलीसाठी नाही तर जनतेला सेवा देण्यासाठी आहोत, याची जाणीव ठेवा, अशी सूचना परिवहन मंत्री परब यांनी केली. त्यांच्या या विधानाची चर्चा नंतर आरटीओ ऑफिस आणि परिसरातील एजंटमध्ये सुरू होती.