प्रतिनिधी / रत्नागिरी
लॉकडाऊन मध्ये जिल्हयात अडकलेल्या नागरिकांनी केलेल्या विनंती अर्जानुसार मंजूरी प्राप्त झालेल्यांना राज्यातील इतर जिल्हयात पाठविण्याची तयारी पूर्ण झाली असून अशा सर्वांना उद्या शुक्रवार दि. 08 मे 2020 रोजी पासून जिल्हयातील विविध बसस्थानंकावरुन एस.टी. मार्फत जाता येणार आहे. अशा एकूण 25 बसेस उद्या जिल्हयातून निघतील. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्व वाहतूक बंद झाली व जिल्हयांच्या सिमा बंद झाल्या. त्यानंतर दोन वेळा लॉकडाऊनची मुदत वाढलेली आहे. याबाबत राज्यात झालेल्या निर्णयानुसार आता जिल्हयात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाणे शक्य होणार आहे.
नागरिकांना यासाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. प्राप्त अर्जातील पहिल्या टप्प्यातील मंजूर अर्जांनुसार नागरिकांना या गाडयांमधून विविध जिल्हयांमध्ये जाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. उद्यापासून जिल्हातील विविध बसस्थानकांमधून सिंधुदूर्ग, रायगड (अलिबाग), बुलढाणा, लातूर, भंडारा, सातारा, गोंदिया आणि अमरावती या 8 जिल्हयांना जाणाऱ्या बसेस सुटतील. यात ज्यांच्याकडे अशा प्रवाशाची परवानगी आहे अशांनीच आपापल्या शहरातील बसस्थानकावर वेळेच्या 2 तास आधी पोहचायचे आहे. प्रत्येक प्रवाशाकडे आरोग्य तपासणी पत्र असणे अनिवार्य आहे. प्रत्येकांने मास्क वापरणे बंधनकारक आहे.