उद्यमबाग, मच्छे औद्योगिक वसाहतींमध्ये शुकशुकाट : 95 टक्के कारखाने बंद
प्रतिनिधी / बेळगाव
औद्योगिक वसाहतींमध्ये सुरू असणारी मशिनची धडधड सोमवारी बंद झाली. प्रशासनाने औद्योगिक कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी त्यावर अनेक निर्बंध लादण्यात आल्याने उद्योजकांनी कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे सोमवारी उद्यमबाग, मच्छे, अनगोळ, नावगे या औद्योगिक वसाहतींमध्ये शुकशुकाट होता. एरव्ही गाडय़ांची गजबज असणाऱया या परिसरात सोमवारी मात्र निरव शांतता होती.
राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्थानिक कामगारांना घेऊन कारखाने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु कामगारांना 24 मे पर्यंत कारखान्यामध्ये राहूनच काम करण्याचे निर्बंध घालून देण्यात आले आहेत. यामुळे कामगारांच्या राहण्याची व जेवणाची सोय उद्योजकांना करावी लागणार होती. कामापेक्षा खर्च जास्त अशी ही परिस्थिती असल्याने कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला. यामुळे सोमवारी बेळगावमधील 95 टक्के कारखाने बंद ठेवण्यात आले होते.
मोठय़ा उद्योगांबरोबरच उद्यमबाग परिसरात अनेक लघुउद्योग आहेत. या लघुउद्योगांमध्ये राहणे शक्मय नाही. तसेच पोलिसांकडून कामगारांची अडवणूक होत असल्याने सर्वच लघुउद्योग बंद ठेवण्यात आले होते. कामगारांची जबाबदारी ही मालकांवर असल्याने कारखाने बंद ठेवण्याचा एकच पर्याय त्यांच्यासमोर होता. दररोज होणारे लाखो रुपयांचे नुकसान सहन करून कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत.
काही कारखान्यांनी केली कामगारांची व्यवस्था
उद्यमबाग, मच्छे परिसरातील काही कारखाने सुरू ठेवण्यात आले होते. कंपन्यांनी बाहेरची घेतलेली कामे पूर्ण करून वेळेत पाठविणे गरजेचे असल्याने त्यांनी काम सुरू ठेवले आहे. त्यांच्यासाठी जवळच्या लॉजवर राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु हे परवडणारे नसल्याने सर्वच कारखान्यांना शक्मय नाही. त्यामुळे केवळ हातावर मोजण्या इतपत कारखाने सुरू होते.
वाहनचालकांना लाठीचा प्रसाद
उद्यमबाग, मच्छे, पिरनवाडी, मजगाव या परिसरात सोमवारी सकाळपासून कडक कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. सकाळी विनाकारण फिरणाऱयांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. तिसरे रेल्वेगेट, फौंड्री क्लस्टर कॉर्नर, बेम्को कॉर्नर, मजगाव कॉर्नर तसेच पिरनवाडी येथे पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. दवाखान्याचे कारण दाखवून फिरणाऱयांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.









