प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणातून गणपतीचा सणानंतर मुंबईत परतणाऱया चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीने सोडलेल्या जादा फेऱयांना चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 855 गाडय़ांचे नियोजन झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये हा प्रतिसाद अतिशय चांगला असून अजून 150 ते 200 गाडय़ा वाढण्याची शक्यता असल्याचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे जवळपास दोन ते अडीच लाख चाकरमानी एप्रिल, मे मध्येच दाखल झाले होते. त्यामुळे गणेशोत्सवाला येणाऱया चाकरमान्यांची संख्या 80 हजार ते 1 लाखापर्यंतच होती. त्यातच सरकारने गणेशोत्सवासाठी उशिरा नियोजन केल्याने केवळ 295 गाडय़ा जिह्यात दाखल झाल्या. गतवर्षी 1500 गाडय़ा दाखल झाल्या होत्या. बहुतांश चाकरमान्यांना खासगी गाडय़ांनी जिल्हय़ात येणे सोयीस्कर वाटले. एसटीने शासनाच्या आदेशानुसार आपले नियोजन चोख पार पाडले. आगमनाला जरी चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी परतीच्या प्रवासाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे भोकरे यांनी सांगितले.
शुक्रवारी महामंडळाचे व्यवस्थापक राहुल तोरो यांनी गणेशोत्सव नियोजन बैठक रत्नागिरीत घेतली. यावेळी चाकरमान्यांना सुरक्षित नेण्यासाठी सोशल डिस्टंन्सिगची काटेकोरपणे अमलबजावणी करा, स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष ठेवणे गरजेचे असून एसटी कर्मचाऱयांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी 855 गाडय़ांचे नियोजन तयार असून वैयक्तिक आरक्षणाद्वारे 175 तर ग्रुप बुकींगच्या 182 अशा एकूण 357 गाडय़ा फुल्ल झाल्या आहेत. रत्नागिरीतून ग्रुप बुकींगच्या 113 तर वैयक्तिक 148 अशा एकूण 261 गाडय़ांचे आरक्षण फुल्ल झाले आहे, तर 294 गाडय़ांचे आरक्षण अंशतः फुल्ल झाल्याची माहिती सुनील भोकरे यांनी दिली. यामध्ये ग्रुप बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटीने प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता नाही तसेच कोणत्याही प्रकारे तिकीट दर न वाढवता आहे त्या दरात प्रवाशांना नेण्यात येणार आहे. एका बसमध्ये 22 प्रवासी याप्रमाणे सोशल डिस्टस्टींग ठेवण्यात येणार असल्याचे भोकरे यांनी सांगितले.









