फरिदाबाद येथील चरणजित कौर नामक एका युवतीने 27 किलो वजन केवळ पपईचे सेवन करून घटविले आहे. ही युवती केवळ 18 वर्षांची आहे. दोन वर्षापूर्वी तिचे वजन 92 किलो होते. त्यामुळे तिने वजन कमी करण्याचा निर्धार केला. आपल्या आहारामध्ये आहारतज्ञांच्या सल्ल्याने अनेक बदल केले. तेलकट, तुपकट व मसालायुक्त पदार्थांच्याऐवजी फळे, भाज्या आणि भरपूर जीवनसत्वे तसेच प्रथिने असणारा आहार सुरू केला. पपईमधून या सर्व पोषकद्रव्यांचा शरीराला पुरवठा होतो. तसेच वजन वाढत नाही. ही माहिती वाचनात आल्यानंतर तिने स्वतःवर हा पपई प्रयोग सुरू केला. त्याचा आश्चर्यकारक परिणाम दिसून आला.

ही तरुणी अद्यापही दुपारच्या जेवणात केवळ पपईचा समावेश करते. साधारणतः पाव किलो पपई हेच तिचे जेवण असते. याशिवाय ती अन्य वेळी सातूची भाकरी, करडीचा भात, शिजवलेल्या पालेभाज्या, सफरचंद आणि अर्धा ग्लास साय काढलेले दूध असा आहार घेते. चरणजितच्या म्हणण्यानुसार जन्माच्या वेळीच तिचे वजन जवळजवळ 10 पौंड होते. ते नंतर वाढतच गेले. पण आता तिने पपईच्या साहाय्याने त्यावर आश्चर्यकारक नियंत्रण मिळविले असून हा उपाय सर्वसामान्यांनाही करता येण्यासारखा आहे, असे तिच्या आहार सल्लागारांचे म्हणणे आहे.









