मुंबई \ ऑनलाईन टीम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पदोन्नती आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे आमदार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया देताना पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत लवकरच तोडगा निघेल, असं सांगितलं. आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच यावर तोडगा निघेल. याशिवाय, पदोन्नतीत आरक्षण मिळालं पाहिजे या माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असं राऊत म्हणाले.
पदोन्नती आरक्षण या विषयी बैठकीत सकारात्मक सांगोपांग चर्चा झाली आहे आणि निश्चितच यावर तोडगा निघेल, अशी मला खात्री आहे. सरकार देखील याबाबत सकारात्मक आहे. सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे आता काही अडचण येणार नाही. लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.
तसेच, ७ मे रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशाबाबतच चर्चा होती. चर्चा झाली असून सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी भूमिका मांडली, त्यावर सर्वांनी अभ्यास करायचं ठरवलं. कायदेशीरबाबी अनेक आहेत. प्रशासकीय बाबी आहेत. सकारात्मक निर्णय होईल, असं सर्वांनी मत व्यक्त केलं आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
पदोन्नतील आरक्षणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.








