बदलाला अनेक नेत्यांचा विरोध : सत्ता घालविण्याची वेळ येण्याची भीती असल्याने निर्णय
प्रतिनिधी / सांगली
जिल्हा परिषद पदाधिकारी बदल करताना सत्ताधारी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही, कालावधीही थोडा राहिला आहे. शिवाय भाजप आणि मित्रपक्षातील नेत्यांनी बदलाला विरोध केल्याने हा विषय थांबला असल्याची चर्चा सुरू आहे.
विद्यमान पदाधिकारी निवड करतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वर्षात पदाधिकारी बदलाचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बदल करावा, अशी मागणी इच्छुक सदस्य अनेक दिवसांपासून करत आहेत. वाढती मागणी लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी महापौर निवडीनंतर जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचे आश्वासन दिले. महापौर निवडीत भाजपचा पराभव झाला. हातची सत्ता गेल्याने भाजप नेत्यांनी बदलाच्या मागणीकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी बदल रेंगाळला आहे. मात्र, इच्छुकांनी तगादा सुरूच ठेवला आहे.
नेत्यांनी शब्द देऊन, पदाधिकारी बदलाचे आश्वासन देऊनही निर्णय होत नाही, टाळाटाळ होत आहे, हे लक्षात येऊ लागल्याने गेले काही दिवस इच्छुकांनी अविश्वास ठराव दाखल करायच्या हालचाली सुरू केल्या. सह्यांची मोहीम पुन्हा गतिमान झाली. त्यामध्येही फसवून सह्या घेतल्याचे आरोप झाले. थेट जिल्हाधिकाऱयांपर्यंत तक्रारी अर्ज गेले. पदाधिकारी होण्यास इच्छुक सदस्यांची आक्रमकता पाहून फडणवीस यांनी मागील आठवडÎात पंढरपूर येथे जिह्यातील नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर संख्याबळाची खात्री करुन पुढील आठवडÎात मुंबईत बैठक घेऊ. एकत्रित बसू. त्यानंतर निर्णय घेऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. याला पंधरा दिवस होत असले तरी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
शिवसेनेची भूमिकाही स्पष्ट नाही. महाडिक गटही बदलाच्या विरोधाचीच आहे. त्यामुळे बदलाचा निर्णय घेतल्यास महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेचीही सत्ता जाण्याची भिती भाजपच्या वरिष्ठांना असून यामुळेच बदलाचा निर्णय थांबविला असल्याची चर्चा सुरू आहे. सध्यस्थितीत भाजप जिल्हा परिषदेमध्ये अल्पमतात आहे. काही सदस्य नाराज आहेत. त्यामुळे बदलाचा जुगार कशासाठी खेळता ? असा खडा सवाल भाजपामधील काही नेत्यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. चार-दोन सदस्य आणि एखाद्या गटाच्या दबावापुढे निर्णय घेणे अडचणीचेच अधिक ठरण्याचीही शक्यता आहे.
अविश्वास ठरावाचा बारही फुसका ठरणार
पदाधिकारी बदलास इच्छुक सदस्य अविश्वास ठरावाची तयारी करत आहेत. मात्र, तालुक्यातील बहुतांश भाजप नेत्यांचा बदलास विरोध दिसत आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्व मानणारे सदस्य अविश्वास ठरावाच्या बाजूने किती राहतील याबाबत शंका आहे. फक्त दबावासाठी अविश्वास आणण्याची भाषा त्या सदस्यांतून केली जात आहे. बहुतांशी नेते बदलाच्या विरोधात असल्याने बदल होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.








