प्रतिनिधी / बेळगाव
राज्य शासनाच्या एसएफसी अनुदानांतर्गत कॅन्टोन्मेंटला मिळणारा निधी 2012 पासून बंद झाला आहे. यामुळे कॅन्टोन्मेंटमधील पथदिपांच्या विद्युत बिलाची थकबाकी दीड कोटी झाली आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील प्रमुख रस्त्यांवरील पथदिपांची देखभाल आणि बिल मनपाने भरावे, अशी भूमिका कॅन्टोन्मेंट बेर्डने घेतली आहे. याबाबत महापालिकेला पत्र पाठविण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत घेण्यात आला.
विद्युत बिलाची थकबाकी वाढत चालल्याने पथदीप सुरू ठेवणे डोईजड झाले असताना शंभर कोटी अनुदानामधून बसविण्यात आलेले डेकोरेटिव्ह पथदीप हस्तांतर करून घेण्याचे पत्र महापालिकेने कॅन्टोन्मेंटला पाठविले आहे. या विषयावर बुधवारी आयोजित केलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री शहर विकास अनुदानातून कॅन्टोन्मेंट परिसरातील विविध रस्त्यांचा विकास करण्यात आला होता. दुतर्फा पथदीप बसविण्यात आले होते. सदर रस्त्यांचे काम पूर्ण होऊन कित्येक महिने लोटले पण अद्यापही पथदीप सुरू करण्यात आले नाहीत. शंभर कोटी अनुदानांतर्गत अर्धवट असलेल्या कामाबाबत नगरविकास खात्याने महापालिकेला नोटीस बजावली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील विकासकामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यासाठी कॅन्टोन्मेंटकडे हस्तांतर करण्यात येणार आहे. याकरिता कॅन्टोन्मेंट हद्दीतील हायस्ट्रीट, चर्चस्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट, पोलीस क्वॉर्टर्स आणि पोस्टमन सर्कल ते ग्लोब थिएटरपर्यंतचे पथदीप हस्तांतर करून घेण्यासाठी महानगरपालिकेने कॅन्टोन्मेंटला पत्र पाठविले होते. या मुद्दय़ावर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. राज्य शासनाने एसएफसी अनुदान देण्याचे 2012 पासून बंद केले आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पथदिपांचे एक कोटी 55 लाखाचे विद्युत बिल थकले आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रमुख रस्त्यांवरून शहरातील सर्व नागरिक ये-जा करीत असतात. कॅन्टोन्मेंटच्या तुलनेत महानगरपालिका हद्दीतील नागरिक रस्त्यांचा वापर अधिक करतात. त्यामुळे पथदिपांची देखभाल करावी आणि विद्युत बिल महानगरपालिकेनेच भरावे, अशी भूमिका बैठकीत अध्यक्षांनी घेतली. तसे पत्र महानगरपालिकेला पाठविण्याची सूचना अध्यक्षांनी केली.
कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता नियमावली करून याचे उल्लंघन करणाऱयांकडून दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दंड आकारणी केल्याखेरीज नागरिक आपला परिसर स्वच्छ ठेवणार नाहीत. यामुळे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नियमावली तयार करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष ब्रिगेडिअर गोविंद कलवाड यांनी दिली. कॅन्टोन्मेंट कार्यक्षेत्रातील स्वच्छतेचे काम करण्यासाठी विविध वाहने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
खानापूर रोडचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. याकरिता या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे आणि ऑक्ट्राय नाक्मयाची इमारत हटविण्यात यावी, अशी मागणी स्मार्ट सिटी कंपनीने कॅन्टोन्मेंटकडे केली आहे. यामुळे हा विषय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी अतिक्रमणाबाबत चर्चा करून हा रस्ता सीडीपीनुसार 24 मीटरप्रमाणे मार्किंग करण्याचे ठरले. जर 24 मीटर जागेत अतिक्रमणे असल्यास हटविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळत नसल्याने कारभार चालविणे मुश्कील बनले आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या शाळा चालविण्यासाठी राज्य शासनाने वर्षाला दोन कोटीचे अनुदान मंजूर करण्याचे पत्र राज्य शासनाला दिले असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा यांनी बैठकीत दिली.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा, उपाध्यक्षा निरंजना अष्टेकर, अरेबिया धारवाडकर, अल्लेदिन किल्लेदार, साजिद शेख, रिझवान बेपारी आदींसह कॅन्टोन्मेंट बोर्डचे अधिकारी उपस्थित होते.









