वार्ताहर/ एकंबे
वडाचीवाडी (ता. कोरेगाव) येथे एका पोल्ट्रीफार्मवर कामगार म्हणून काम करत असलेल्या युवकाचा त्याच्या मित्रानेच डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (दि. 14) रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. विकास मोरे असे मृत व्यक्तीचे नाव असून, खून करणाऱया व्यक्तीचे नाव लखन मोरे असे आहे. दोघेही साळशिरंबे (ता. कराड) येथील मूळ रहिवासी आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साळशिरंबे (ता. कराड) येथे लखन मोरे व मंगल लखन मोरे हे पती-पत्नी म्हणून राहत होते. त्यांचा विवाह फार वर्षांपूर्वी झाला असून, त्यांना चार अपत्ये आहेत. लखन हा दारुच्या आहारी गेला होता आणि सातत्याने तो पत्नी व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत होता. त्याच्या जाचाला कंटाळलेल्या मंगल हिची विकास मोरे याच्याबरोबर ओळख झाली आणि कालांतराने त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
लखन याच्या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या मंगल हिने विकास सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी कोरेगाव तालुक्यातील वडाचीवाडी येथील ब्रम्हा जाधव याच्या पोल्ट्रीफार्मवर कामगार म्हणून काम शोधले. गेले 8 ते 9 महिने ते दोघे व मंगल हिच्या मुलांसमवेत राहत आहेत. दरम्यानच्या काळात मंगल हिचा पती लखन हा साळशिरंबे येथून वडाचीवाडी येथे राहण्यास आला. मंगल, विकास व लखन हे मुलांसमवेत एकत्र राहत होते. लखन हा परिसरात भंगार गोळा करुन विक्री करण्याचा व्यवसाय करत होता. मात्र तो दिवसभर दारुच्या नशेतच राहत होता.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून लखन हा सतत मंगल हिला तुला आणि तुझ्या मुलींना संपविणार आहे, तुमचा जीव घेणार आहे, तुमचा खून करणार आहे, अशा धमक्या देत होता. तो दारु पिल्यावर सतत बडबडतो, म्हणून मंगल व तिच्या मुलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शुक्रवारी सकाळी भंगार गोळा करायला बाहेर पडलेला लखन हा दुपारी दारु पिऊन घरी परतला, तेव्हा सुध्दा तो शिव्याच देत होता. सायंकाळी त्याने दारुच्या नशेत पुन्हा शिवीगाळ केली. रात्री सर्वांनीच एकत्रित जेवण केले. लखन व त्याच्या मुली पत्र्याच्या शेडमधील एका खोलीत झोपले तर विकास व मंगल हे एका खोलीत झोपले होते. 11.30 च्या सुमारास लखन याने विकासच्या डोक्यात दगड घालून खून केला.
लखनचा रुद्रवतार पाहून मंगलच्या तोंडचे पाणी पळाले. तिने व तिच्या मुलींनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे लोक जमा झाले. त्यांनी तातडीने पोल्ट्रीफार्मचे मालक ब्रम्हा जाधव याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावली. विकास याला सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱयांनी त्याला मृत घोषित केले.
मंगल हिने दिलेल्या तक्रारीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम, सहाय्यक उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस नाईक अमोल सपकाळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर लखन मोरे याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी सकाळी पोलीस मुख्यालयातून आलेल्या श्वान पथकाने लखन याचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करुन संशयित आरोपी लखन मोरे याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम, सहाय्यक उपनिरीक्षक विजय जाधव व पोलीस नाईक अमोल सपकाळ अधिक तपास करत आहेत.








