प्रतिनिधी / पर्वरी
पती-पत्नीचे नाते हे अतुट असते. आयुष्यातील उमेदीच्या काळापासून ते शेवटपर्यत त्यांची एकमेकांना सोबत असते. अशाच एका संजयनगर-आल्ततोर्ड, पर्वरी येथील दाम्पत्याचा शेवटही सोबतच झाला. पती शशिकांत सावंत (72) यांच्या निधनची बातमी समजताच पत्नी सोनाली (सुलभा) सावंत (69) यांनीही अवघ्या पाच मिनिटातच आपले प्राण सोडली. मंगळवारी दि. 4 रोजी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोवा टेक्निकल इन्स्टिटय़ूटमधून निवृत्त झालेले शशिकांत सावंत व त्यांच्या पत्नी सोनाली सावंत हे दाम्पत्य संजयनगर येथे राहत होते. त्यांना तीन विवाहित कन्या आहेत त्यामुळे घरात ते दोघेच राहत होते. एका महिन्यापूर्वी शशिकांक सावंत यांचा अतघात झाला होता. त्यावर म्हापशातील जिल्हा इस्पितळात उपचार सुरू होते. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने ते कोमात गेले. यानंतर त्यांना गोमेकॉमध्ये अधिक उपचारांसाठी हलविण्यात आले. यातच मंगळवारी दि. 4 रोजी रात्री 11.45 वा. त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या पतीच्या निधनचे वृत्त पत्नी सोनाली सावंत यांना समजताच अवघ्या पाच मिनिटात 11.50 वा. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि पतीसोबत त्यांनीही जगाचा निरोप घेतला. या घटनेने संजयनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
शशिकांत सावंत हे माजी शिक्षक होते तर सुलभा सावंत या गेली 30 वर्षे परिसरात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात कन्या स्वरूपा, स्वप्ना, स्वर्तिमा, जावई असा परिवार आहे. आमदार रोहन खंवटे, सरपंच संदीप साळगावकर, जि.प. सदस्य भुपेश नाईक, अनुज हरमळकर यांनी शोक व्यक्त केला. जावई यतीन चोडणकर यांनी मुखाग्नी दिली.









