ऑनलाईन टीम / हरिद्वार :
पतंजलीचे ‘कोरोनिल’ हे औषध तीन दिवसात कोरोना रुग्ण बरा करते, असा दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे. तसेच हे औषध येत्या सोमवारपासून पतंजलीच्या सर्व स्टोअर्समध्ये हे औषध विक्रीसाठी उपलब्ध असेल, असेही त्यांनी सांगितले.
हरिद्वारच्या पतंजली योगपीठात आज ‘कोरोनिल’चे लाँचिंग करण्यात करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बाबा रामदेव बोलत होते. ते म्हणाले, पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी कोरोनिल हे औषध तयार केले आहे. या औषधात गिलोय, अश्वगंधा, तुलसी, श्वसारी रस आणि अणू तेलाचे मिश्रण आहे. औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतो. त्यामुळे या औषधाने तीन दिवसात कोरोना रुग्ण बरा होईल.
कोरोनिल हे औषध तयार करण्यासाठी क्लिनिकल कंट्रोल स्टडी आणि क्लिनिकल कंट्रोल ट्राय या दोन उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला. क्लिनिकल कंट्रोल स्टडीच्या माध्यमातून 100 लोकांवर उपचार करण्यात आले. त्यामध्ये 95 रुग्ण होते. त्यामधील 69 रुग्णांचा रिपोर्ट 3 दिवसात निगेटिव्ह आला. तर क्लिनिकल कंट्रोल ट्रायद्वारे 280 रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यामधील 100 टक्के रुग्ण 7 दिवसात बरे झाल्याचेही बाबा रामदेव यांनी सांगितले.