आयुष, जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाल्याचे प्रतिपादन, केंद्रीय मंत्रीही उपस्थित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने कोरोनाचे नवे औषध सादर केले आहे. हे औषध सर्व चाचण्या करून आणि आवश्यक अनुमती मिळवूनच सादर करण्यात आल्याने त्यावर आता कोणीही आक्षेप घेऊ शकणार नाही, असे प्रतिपादन बाबांनी सादरीकरण कार्यक्रमात केले. या औषधाला भारताचे आयुष मंत्रालय आणि जागतिक आरेग्य संघटनेची मान्यता मिळाली आहे, असे प्रतिपादन सादरीकरण कार्यक्रमात करण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
हे औषध गोळीच्या स्वरूपात आहे. ‘कोरोनिल’ असे त्याचे नाव आहे. या औषधाला आयुष मंत्रालयाच्या औषध विभागाने मान्यता दिली आहे. आयुर्वेदीय औषध पद्धतीच्या माध्यमातून ते बनविण्यात आले असून कोरोनाच्या चिकित्सा पद्धतींमध्ये त्याचा समावेश आयुष मंत्रालयाने केला आहे.
गेल्यावेळी अपयश
नऊ महिन्यांपूर्वी बाबा रामदेव यांनी कोरोनावरील औषधाचे सादरीकरण केले होते. तथापि, या औषधाला मान्यता नाही. तसेच ते केवळ एका शक्तीवर्धक पदार्थच्या स्वरूपातील आहे. कोरोनाचे विषाणू नष्ट करण्याची त्याची क्षमता नाही, असे आयुष विभागाने घोषित केले होते. काही राज्यांमध्येही या औषधावर बंदी घोषित करण्यात आली होती. परिणामी. बाबांचा तो प्रयोग फसला होता.
आता कोरोनाच्या काही लसी उपलब्ध झालेल्या आहेत. तथापि, सोप्या पद्धतीने घेतले जाऊ शकेल अशा औषधाचा शोध लावण्याचे कार्य जगभरात सुरू आहे. या प्रयत्नात आपल्याला यश आले आहे, असे बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे. सादरीकरणाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री उपस्थित असल्याने बाबांचे अनुमती मिळाल्याचे प्रतिपादन सत्य असल्याचे दिसून येत आहे.
मंत्र्यांकडून कागदपत्र प्रदर्शित
या औषधाची परिणामकारकता सिद्ध करणाऱया संशोधनाचे कागदपत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसिद्ध केले. डॉ हर्षवर्धन यांनीही सादरीकरण कार्यक्रमात भाग घेतला. हे औषध 100 हून अधिक संशोधकांच्या आणि शास्त्रज्ञांच्या प्रयत्नामुळे साकार झाले आहे. ते पूर्णतः निर्धोक असून त्याचे दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे कोरोना बरा होऊ शकतो, असे प्रतिपादन करण्यात आले.
आरोग्य संघटनेची मान्यता
आपल्या नव्या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाली आहे, असे पतंजलीचे कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांनी स्पष्ट केले. या औषधाचा उपयोग गेले सहा महिने विविध पातळय़ांवर होत होता. हे औषध 153 देशांमध्ये मान्यताप्राप्त असून या औषधाच्या परिणामकारकतेसंबंधात 250 हून अधिक संशोधने झाली आहेत. या सर्व संशोधनांचे निष्कर्ष सकारात्मक आले असून आपल्याकडे याचे संपूर्ण पुरावे आहेत, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
आयुर्वेदाची शक्ती
आयुर्वेद या भारतीय उपचारपद्धतीचे सामर्थ्य अनन्यसाधारण आहे. ही बाब या औषधाने सिद्ध केली. आजवर आयुर्वेदाची टिंगलटवाळी केली गेली. तसेच या उपचारपद्धतीला अवमानित केले गेले. तथापि, हे औषध या आरोपांना खोटे ठरविण्यास समर्थ आहे, असेही प्रतिपादन करण्यात आले आहे.
बॉक्स
बाबांच्या नव्या औषधाची उत्सुकता
ड औषधाच्या परिणामकारकतेला जागतिक प्रमाणपत्र असल्याचे प्रतिपादन
ड केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे औषधाची विश्वासार्हता अधिक वाढली









