वन्यजीव सप्ताहानिमित्त हत्तींना आकर्षक अलंकारांनी सजविले
प्रतिनिधी / कारवार
67 व्या वन्यजीव सप्ताहाचा एक भाग म्हणून जोयडा तालुक्यातील पणसोली येथे ‘हत्ती दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असलेल्या हत्तींना आकर्षक अलंकारांनी सजविण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना पणसोली रेंज फॉरेस्ट ऑफिसर संगमेश पाटील म्हणाले, प्रत्येक वर्षी आमच्या देशात वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताहातील एक दिवस हत्ती दिन म्हणून साजरा केला जात आहे. हत्ती दिनाचे औचित्य साधून हत्ती, हत्तीची संतती आणि हत्तीच्या जीवनाच्या चित्रणाची माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अगदी पुरातन काळापासून हत्ती आणि मानवामध्ये अतिशय सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. मानवाच्या विकासात हत्तींनी नेहमीच हातभार लावलेला आहे. हत्तींबद्दल आकर्षण नसलेला मनुष्य सापडणार नाही, असे स्पष्ट करून पाटील पुढे म्हणाले, स्वार्थापोटी हत्तींचे अस्तित्त्व संपुष्टात येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. हत्तींची संख्या कशी वाढवता येईल, यासाठी वनखाते प्रयत्नशील आहे. वनखात्याच्या प्रयत्नांना जनतेने हातभार लावला पाहिजे.
यावेळी पणसोलीचे डेप्युटी आरएफओ राजकुमार बसवनगौड, प्रसन्ना अमरावती, अण्णप्पा, शिवनगौड, अमित एस. सह वन खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.









