एकाच दिवशी सापडले 27 रुग्ण : राज्यभरात मंगळवारी 415 बाधित : सहा जणांचा बळी
प्रतिनिधी / पणजी
राजधानी पणजीसह संपूर्ण गोवा राज्य आता कोरोनाग्रस्त होत असल्याचे समोर येत असून काल मंगळवारी कोरोनाने 6 जणांचे बळी घेतल्याने एकूण मृत्यूंची संख्या 86 झाली आहे. पणजी शहरातही काल एकाच दिवशी सर्वाधिक 27 रुग्ण सापडल्याने राजधानी आता हॉटस्पॉटच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यभरात मंगळवारी 415 नवीन कोरोनाबाधित मिळाले असून 272 जणांना बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे. सध्या 2878 कोरोनाग्रस्त सक्रिय रुग्ण असून आतापर्यंतच्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 9444 वर पोहचली आहे तर आतापर्यंत एकूण 6480 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.
राजधानी पणजीत काल मंगळवारी 27 नवे रुग्ण सापडल्याने पणजीतील एकूण रुग्णसंख्या 122 झाली आहे. पणजी सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरु लागली आहे. पणजीत एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पणजीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ दिसून येत आहे.
पणजीत मंगळवारी 27 कोरोना बाधित
मंगळवारी पणजी सापडलेल्या 27 रुग्णांपैकी, आल्तिनो जीआरपी क्वॉटर्स व इतर भागात मिळून 9, दोनापावला 4, मिरामार 3, करंझाळे 2, सांत ईनेझ 2, रायबंदर 2, मुख्य पणजीत 2, भाटले, मिलिटरी रेसिडेंशियल व कांपाल येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. रुग्ण सापडलेल्या सर्व भागात त्वरित निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
आल्तिनो कंटेनमेंट झोन कायम
शनिवारी आल्तिनो भागातील सुमारे 148 जणांचे स्वॅब नमूने घेण्यात आले होते, यातील 7 जणांचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने या भागातील सीलबंदी आणखी जवळपास 14 ते 15 दिवस कायम राहणार आहे. नंतर परिस्थिती पाहूनच यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरण
पणजीत मंगळवारी अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांमध्येही रुग्ण सापडलेल्या भागांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने टोंक, आल्तिनो येथील वन खाते, कामत कॉम्प्लेक्स, पॉलिटेक्निक क्वॉर्टर्स यांचा समावेश आहे. तसेच मंगळवारी मिळालेल्या कोरोना रुग्णांच्या भागांमध्ये आज बुधवारी निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
राज्यात मंगळवरी 6 मृत्यू
गोवा वेल्हा येथील 45 वर्षीय पुरूष, वास्कोतील 72, 68, आणि 65 वर्षीय अशा चार जणांना कोविड हॉस्पिटल मडगाव येथे मृत्यू आला. बेती आणि वास्कोतील 68 वर्षीय व 73 वर्षीय रुग्णांचा गोवा मेडीकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. संशयित रुग्ण म्हणून 93 जणांना आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे.
विविध हॉटेल्स, रेसिडेन्सीमध्ये 86 जणांना क्वॉरंटाईन ठेवण्यात आले असून 25 जणांना संस्थात्मक क्वॉरंटाईन केले आहे. काल 2590 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले तर 2451 जणांचे अहवाल प्राप्त झाले, त्यात 415 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले तर 869 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
विविध आरोग्य केंद्रातील
गोव्यातील विविध आरोग्य केंद्रात नोंदणी झालेल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे, डिचोली 16, सांखळी 90, पेडणे 78, वाळपई 103, म्हापसा 101, पणजी 122, हळदोणा 36, बेतकी 24, कांदोळी 76, कासारवर्णे 14, कोलवाळ 60, खोर्ली 77, चिंबल 151, शिवोली 23, पर्वरी 66, मये 32, कुडचडे 52, काणकोण 25, मडगाव 279, वास्को 372, बाळ्ळी 64, कासावली 62, चिंचिणी 8, कुठ्ठाळी 233, कुडतरी 80, लोटली 38, मडकई 51, केपे 74, सांगे 75, शिरोडा 56, धारबांदोडा 104, फोंडा 169, नावेली 65, प्रत्येक आरोग्य केंद्रातील नोंदणी संख्या वाढतच असून अनेक केंद्रात ती शंभरीकडे वाटचाल करीत आहे.
राज्यात 11 ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधित 9444
11 ऑगस्टपर्यंत बरे झालेले रुग्ण 6480
11 ऑगस्टपर्यंत उपचार घेणारे रुग्ण 2878
11 ऑगस्टचे नवीन रुग्ण 415
11 ऑगस्ट रोजी बरे झालेले रुग्ण 272
11 ऑगस्टचे मृत्यू 6
11 ऑस्टपर्यंत एकूण मृत्यू 86
…………………………………………………………………………………………………………..
वास्कोतील बळींचे सत्र थांबता थांबेना
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात कोरोनाची सुरुवात झाली ती मांगोरहिल-वास्को येथून. त्यानंतर कोरोनाचे संक्रमण संपूर्ण गोव्यात पसरले. त्याच मुरगांव तालुक्याला कोरोनाने सर्वाधिक दणका दिला आहे. या ठिकाणी सुरू झालेले बळीचे सत्र थांबता थांबेना, अशी परिस्थिती झाली आहे, काल मंगळवारी मडगावच्या कोविड हॉस्पिटलात चार जणांचे बळी गेले. त्यात तिघेजण हे वास्कोतील होते तर एक व्यक्ती गोवा वेल्हा येथील आहे.
मंगळवारी सकाळी 7.35 वा. पहिला बळी गेला तो गोवा वेल्हा येथील 45 वर्षीय पुरूषाचा. त्याला विविध आजारांची पार्श्वभूमी होती. त्यानंतर सकाळी 11.15 वा. सडा-वास्को येथील 72 वर्षीय पुरूषाचा बळी गेला. त्याला न्युमोनिया व हृदय विकाराचा आजार होता. तिसरा बळी सकाळी 11.30 हा मेस्तावाडा-वास्को येथील सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा कलाकार गोकुळदास च्यारी यांचा होता. ते 68 वर्षाचे होते. गोव्यात ज्यांनी ऑर्केस्ट्राचा पाया घातला ते गोकुळदास च्यारी यांना अन्य आजारांची पार्श्वभूमी होती. त्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते कोविड हॉस्पिटलात उपचार घेत होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दुपारी 2.10 वा. बायणा-वास्को येथील 65 वर्षीय पुरूषाचा बळी गेला. हा कोविड हॉस्पिटलातील चौथा बळी होता. त्याला मधुमेह तसेच फिटस् या आजारांची पार्श्वभूमी होती. मडगावच्या कोविड हॉस्पिटलात आत्तापर्यंत 60 जणांचे बळी गेले आहेत. उर्वरित बळी हे गोमेकॉत, आझिलो हॉस्पिटल म्हापसा व चिखली हॉस्पिटलात गेले आहेत. काल आणखी दोन बळीची नोंद गोमेकॉत झाली. रेईस-मांगुस, बेती येथील 68 वर्षीय पुरूषाचा गोमेकॉत सोमवारी बळी गेला होता. तर 73 वर्षीय सडा-वास्को येथील पुरूषाचा बळी काल मंगळवारी गेला. या दोघांना अन्य आजारांची पार्श्वभूमी होती.
डॉक्टराने दिला जुन्या आठवणीना उजाळा
काल बळी गेलेल्या गोकुळदास च्यारी सोबत अनेकांनी 1980च्या दशकात ऑर्केस्ट्रातून गाणी गायली होती. त्यात मडगावच्या ईएसआय हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. विश्वजित फळदेसाई यांचाही समावेश होता. काल जेव्हा, गोकुळदास च्यारी गेले याची कल्पना डॉ. विश्वजित यांना देण्यात आली, तेव्हा त्यांच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. विद्यार्थी देशत त्यांच्यासोबत कार्यक्रम सादर केल्याची आठवण डॉक्टरांनी करून दिली.









