प्रतिनिधी / पणजी :
माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी पणजी महापालिकेसाठी रु. 890 कोटींची आर्थिक मदत देण्याची मागणी 15 व्या वित्त आयोगाकडे केली आहे. तसे निवेदन त्यांनी आयोगाला पाठवले असून त्याच्या प्रती मुख्यमंत्री व पणजी मनपा आयुक्तांना सादर केल्या आहेत.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत फुर्तादो यांनी वरील महिती देऊन सांगितले की पणजी मनपामध्ये अनेक कामगार कर्मचारी अनेक वर्षे काम करीत असून त्यांना कायम नोकरी, इतर सोयी सुविधा देण्याची गरज आहे. त्यासाठी रु. 90 कोटीची आवश्यकता आहे. पणजी शहरातील साधन सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी व इतर सुधारणा करायची झाल्यास रु. 250 कोटी अनुदानाची गरज आहे.
वारसास्थळांच्या जतनासाठी हव्यात 300 कोटी
पणजी शहरात अनेक ऐतिहासिक इमारती वारसास्थळे आहेत. त्यांची संख्या 40 च्या वर असून त्यांचे जतन करणे काळाची गरज आहे. ते संवर्धन केले तरच त्या इमारती टिकणार आहेत नाहीतर त्या नामशेष होतील. आगामी पिढीला त्यांची माहिती मिळावी म्हणून त्यांचे जतन करण्यासाठी रु. 300 कोटी तरी मिळाले पाहिजेत असे त्यांनी आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आपत्ती पूर्वसूचना देणारी यंत्रणा आवश्यक
पणजी हे किनारी शहर आहे. त्यामुळे चक्रीवादळ, पुराचा धोका टाळण्यासाठी तशी सूचना देणारी यंत्रणा तैनात करण्याची आवश्यकता भासत आहे. लोकवास्तू तसेच एकंदरीत शहराचे रक्षण करण्यासाठी सुमारे रु. 250 कोटी देण्यात यावेत अशी शिफारस फुर्तादो यांनी निवेदनातून केली आहे. पणजी शहरासाठी आपतकालीन यंत्रणा उभारली पाहिजे नाहीतर कधीतरी वादळ, पुराचा तडाखा बसू शकतो आणि पुर्वसूचना न मिळाल्यास काहीही होऊ शकते म्हणून सदर यंत्रणा उभारण्याची सूचना फुर्तादो यांनी केली आहे. 2014 मध्येही असे निवेदन 14 व्या वित्त आयोगाकडे सादर केले होते. परंतु फार मोठा निधी मिळाला नसल्याची खंत त्यांनी प्रकट केली.









