प्रतिनिधी/ पणजी
पणजी महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 2020-21 सादर करून त्यास मान्यता देण्यासाठी आज सोमवार दि. 9 मार्च रोजी मनपा मंडळाची विशेष बैठक सायंकाळी 4 वा. होणार आहे. त्यात महापौर उदय मडकईकर हे अर्थसंकल्प मांडणार असून तो मंजूर केला जाणार आहे. त्या अर्थसंकल्पातून पणजी मनपाची एकंदरीत तूट व महसूल प्राप्ती यावर प्रकाश पडणार आहे. दरम्यान राजधानी पणजीतील काही प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती पणजी मनपातर्फे सुरू झाली असून वाहनचालकांना त्यातून दिलासा मिळणार आहे.
घरपट्टीची वसूली किती शिल्लक आहे, तसेच पुढील वर्षात 2020-21 मध्ये किती महसूल मिळणार याचे गणित अर्थसंकल्पातून मांडण्यात येणार आहे. वीज पाण्याचे कोटय़वधीचे बिल (मार्केट) प्रलंबित असून त्याची आकडेवारी अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे. शिवाय अलिकडेच पणजी मनपातर्फे शहरातील काही रस्त्यावर ‘पे पार्किंग’ योजना सुरू करण्यात आली असून त्याचा महसुली वाटा किती असणार याचेही उत्तर अर्थसंकल्पातून मिळणार आहे.
पणजी मार्केटमधील गाळेधारक, दुकानदार व पणजी मनपा भाडे कराराचा विषय पुन्हा एकदा या बैठकीसमोर येणार आहे. त्यामुळे त्यावर चर्चा होणार असून तो करार करायचा की नाही याचाही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय पणजी शिमगोत्सव तसेच कचर व इतर काही विषय बैठकीसमोर चर्चेसाठी येतील, असा अंदाज आहे.
प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू
पणजी महापौर उदय मडकईकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे राजधानीतील काही प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण हाती घेण्यात आले असून पणजी मार्केट मधील एका रस्त्याचे डांबरीकरण काल रविवारी करण्यात आले. पणजीतील अनेक रस्ते खड्डेमय झाले होते आणि त्याचे डांबरीकरण व्हावे अशी वाहनचालकांची मागणी होती. तिची दखल घेऊन पणजी मनपाने ते काम सुरू केले आहे. पणजीच्या 10 प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.