सरत्या सप्ताहात शेअर बाजारात नकारात्मक वातावरणाचे ढग काळोख निर्माण करुन गेले. याची कारणे अर्थातच जागतिक स्तरावरील होती. कोरोनाची दुसरी लाट, त्यासाठी सुरु झालेले लॉकडाऊन-2 आणि अमेरिकेच्या निवडणुका यामुळे बाजारात झालेली नफेखोरी चालू आठवडय़ातही कायम राहील असे दिसते. बाजारातील घसरणीने गुंतवणूकदारांना फटका बसला असला तरी ही स्थिती कायम राहात नाही, हे लक्षात घ्यायला हवे. उलट अशा घसरणीच्या काळात दिग्गज कंपन्यांच्या समभागांची खरेदी करण्याची संधीही निर्माण होते. योग्य निवड करुन या संधीचे सोने नक्कीच करता येते.
मार्च महिन्यानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये सरत्या आठवडय़ात सर्वांत मोठी पडझड नोंदवली गेली आहे. जागतिक शेअर बाजारांचा एमएससीआय ऑल कंट्री वर्ल्ड निर्देशांकात गतसप्ताहात 5.3 टक्क्यांनी घटलेला दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी 135 अंकांनी घसरुन 39,614 अंकांवर बंद झाला; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 28 अंकांनी घसरुन 11,642 वर बंद झाला. सप्ताहाच्या एकूण पाच सत्रांचा विचार करता सेन्सेक्समध्ये 1071 अंकांची आणि निफ्टीमध्ये 283 अंकांची घसरण झाली. बीएसई आयटी इंडेक्स 3.12 टक्क्यांनी घसरला. बाजारात नोंदणीकृत कंपन्यांना 2.65 लाख कोटींचा फटका सरता आठवडा देऊन गेला.
आठवडय़ाभरात एचडीएफसी 6.87 टक्के, इन्फोसिस 5.45 टक्के, रिलायन्स 2.27 टक्के अशी घसरण दिसून आली. वाहनक्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची नफेखोरीसाठी मोठय़ा प्रमाणावर विक्री झाली. तथापि, इंडसइंड बँकेच्या अधिग्रहणाच्या वृत्ताने कोटक बँकेच्या समभागाने गुंतवणूकदारांना आठवडाभरात 11.91 टक्के परतावा दिला. व्होडाफोन आयडीयाचा ताळेबंदातील तोटा कमी झाल्याने या समभागांमध्ये 5.5 टक्क्यांची वाढ दिसून आली. याखेरीज रुट मोबाईल, अदानी ग्रीन, ब्ल्यू डार्ट, अदानी गॅस या समभागांमध्ये 10 ते 23 टक्क्यांपर्यंत वृद्धी दिसून आली. यातील रूट मोबाईलच्या समभागात चार दिवसांत 26 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
बाजारातील घसरणीची कारणे मागील दोन आठवडय़ांपासून वर्तवली जात होती तीच आहेत. युरोप-अमेरिकेमध्ये कोरोनाबाधितांचे आकडे पुन्हा वाढत चालले आहेत. फ्रान्स आणि जर्मनीमध्ये लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात आले आहेत. भारतात दिल्लीमध्येही कोरोनाग्रस्तांचे आकडे लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहेत. दुसरीकडे, अमेरिकेमध्ये आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात होणारी दिरंगाई आणि आता निवडणुकींनंतर ते जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा यामुळे जगभरातील बाजारांवर प्रतिकूल परिणाम दिसून आले. आशियाई बाजार, जपानमधील निक्केई निर्देशांक, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हॉँगकाँगचा हेंगसेंग निर्देशांकही गडगडले. यामुळे जागतिक बाजारातही सरत्या आठवडय़ात गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा लावला गेला. गेल्या आठवडय़ाभरात ब्रेंट क्रूडचे भावही जवळपास 10 टक्क्यांनी घसरून 37 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत आले आहेत.
या चिंताजनक पार्श्वभूमीवर यंदाच्या आठवडय़ातील रणनीती ठरवायची आहे. शेअर बाजाराच्या काही विश्लेषकांकडून एक सल्ला नेहमी दिला जातो, तो म्हणजे कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये ज्या कंपन्यांचे समभाग तेजीचा कल सातत्याने दर्शवतात त्या समभागांमध्ये वर्षाच्या उत्तरार्धातील तीन महिन्यांत फारशी चमकदार कामगिरी दिसून येत नाही. हा सिद्धांत गेल्या दहा वर्षांच्या अभ्यासातून मांडला गेला आहे. त्याअनुषंगाने विचार करता गुंतवणूकदारांनी आता आयटी आणि फार्मा कंपन्यांकडून थोडेसे बाजूला जात बँकिंग आणि सिमेंट कंपन्यांच्या समभागांकडे वळले पाहिजे.
जागतिक पातळीवरील स्थितीचा दबाव शेअर बाजारावर वाढत असला तरी गेल्या तीन आठवडय़ांत देशांतर्गत कंपन्यांच्या तिमाही निकालांनी आशेचे किरणही दाखवले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे या निकालांनी दाखवून दिले आहे. कोटक महिंद्रा बँक, लार्सन अँड टुर्बो या कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. अमेरिकेच्या निवडणूक निकालांचे जाहीर झाल्यानंतर बाजारात अस्थिरता निर्माण करणारा एक घटक कमी होईल. तरीही कोरोनोची धास्ती कायम असल्याने बाजारात पडझड सुरु राहू शकते. अशा अनिश्चिततेच्या काळात जोखीम वाढलेली असते. त्याच वेळी बाजारात जेव्हा जेव्हा मोठी घसरण होते तेव्हा दिग्गज कंपन्यांच्या समभागांची खरेदी करण्याची संधीही उपलब्ध होत असते. गुंतवणूकदारांनी अत्यंत सावधगिरीने आणि अभ्यासूपणाने अशा समभागांची निवड केल्यास संधीचे सोने झाल्यावाचून राहात नाही. कारण बाजारातील आजची स्थिती ही तात्पुरती आहे, हे विसरुन चालणार नाही. म्हणूनच आगामी तीन-सहा महिन्यांत ज्या समभागांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, असे समभाग निवडावेत.
यासाठी भारती एअरटेलचा समभाग 432 रुपयांवर असून तो आगामी काळात 600 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. कंपनीच्या तिमाही निकालातून नफाक्षमता वाढल्याचे दिसून आले आहे. टाटा स्टीलचा 408.70 रुपयांवर असणारा समभाग येणार्या तीन महिन्यांत 475 रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. टाटा स्टीलचेही दुसऱया तिमाहीतील निकाल येणेबाकी आहे. एनटीपीसी या पीएसयू कंपनीचा समभाग 88.35 रुपयांवर असून यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक विश्लेषकांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा समभाग अत्यंत फायद्याचा ठरण्याची शक्यता वर्तवली आहे. ऍक्सिस बँकेचा समभागही 491 रुपयांवर असून तो नजिकच्या काही महिन्यांत 600 रुपयांपर्यंत पोहोचण्याचे संकेत आहेत. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचा समभाग आगामी काळात 171.95 वरुन 200 च्या पुढे जाऊ शकतो. रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग गत आठवडय़ात चांगलाच घसरला होता. फ्युचरसोबतचा त्यांचा करार सध्या अडचणीत सापडला आहे. तसेच रिलायन्सचा नफाही 15 टक्क्यांनी घटला आहे. परंतु जिओचा नफा तिपटींनी वाढला आहे. 2064.35 रुपयांवर असलेला हा समभाग पुन्हा 2200 च्या पुढे जाऊ शकतो. चालू आठवडय़ात आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी आणि सन फार्माच्या तिमाही निकालांच्या परिणामांवर लक्ष ठेवून राहणे आवश्यक आहे.
सारांश, शेअर बाजारातील पडझडीमुळे निराश होण्याचे कारण नाही. 2001, 2003, 2006, 2008, 2010, 2013, 2015, 2018 आणि 2020 मध्ये बाजारात अशा तीव्र घसरणी झालेल्या दिसून आल्या; पण बाजाराने पुन्हा नवा उच्चांक गाठला. अमेरिकेत ट्रम्प अध्यक्ष बनले तेव्हा सुरुवातीला बाजाराने नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती; परंतु चार वर्षांत बाजार दुपटीने वधारला. त्यामुळे शेअर बाजारातील घसरणीमुळे निराश होण्याऐवजी सकारात्मकतेने चांगल्या समभागांचा शोध घेऊन त्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
– संदीप पाटील









