एम. के. हुबळी येथील घटना, पाच जणांना अटक
प्रतिनिधी / बेळगाव
दोघा जणांच्या आर्थिक व्यवहारात मध्यस्ती करणाऱया एम. के. हुबळी येथील एका धाबा मालकाचा खून करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून कित्तूर पोलीस स्थानकात आठहून अधिक जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. फुल विक्री व्यवसायातील 1500 रुपयांच्या आर्थिक व्यवहारात मध्यस्ती केल्याने धाबा मालकाचा खून करण्यात आला.
प्रकाश बसवराज नागनूर (वय 35, मुळचा रा. बैलहोंगल, सध्या रा. एम. के. हुबळी) असे त्याचे नाव आहे. प्रकाश हा पंचवटी धाब्याचा मालक होता. आठहून अधिक जणांच्या एका टोळक्मयाने पाण्याचा जग, चहाच्या किटलीने मारहाण करुन त्याचा खून केल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी व त्यांच्या सहकाऱयांनी एम. के. हुबळीला भेट देवून पाहणी केली.
या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अब्दुलअजीज महम्मदअली बडेगार, महम्मदशफी उर्फ सद्दाम रफीकअहम्मद बडेगार, शकिलअहम्मद रफीकअम्मद बडेगार, इरफान मोदीनशा बडेगार, साजिद शब्बीरअहम्मद बडेगार (सर्व रा. एम. के. हुबळी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली आहे.









