वार्ताहर/ कराड
17 जुलैपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये दिलासा दिल्याने शनिवारी तब्बल 15 दिवसानंतर कराडची बाजारपेठ पुन्हा सुरू झाली. बाजारपेठेतील बहुतांश दुकाने सुरू झाल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू होती.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्चपासून देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. मात्र सातारा जिल्हय़ातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच असल्याने जिल्हाधिकाऱयांनी 17 जुलैपासून जिल्हय़ात लॉकडाऊन केले होते. त्यामुळे दवाखाने, औषधे, किराणा, भाजीपाला आदी अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती.
शनिवारपासून मात्र अटी व शर्थींवर सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. आधीच चार महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे शहराची बाजारपेठ बंद होती. त्यातच सातारा जिल्हय़ात पुन्हा लॉकडाऊन केल्याने जिल्हय़ाची बाजारपेठ बंद होती. शनिवारी ईद होती. त्यातच श्रावण महिना सुरू आहे. किराणा व अत्यावश्यक सेवेतील साहित्य सोडून नागरिकांना अन्य प्रकारच्या खरेदीला 15 दिवसांत संधी मिळाली नव्हती. त्यामुळे शनिवारी बाजारपेठ सुरू झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन
पंधरा दिवसानंतर दुकाने सुरू झाल्याने बाजारपेठेत गर्दी होणार हे अपेक्षित होते. त्यामुळे व्यापाऱयांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. दुकानात गर्दी होऊ नये यासाठी दारात दोऱया बांधण्यात आल्या आहेत. तर दुकानात एका वेळी कमीत कमी लोकांना प्रवेश दिला जात आहे. बाजारपेठेसह शहरात फिरणाऱया नागरिकांकडून मास्कचा वापर होत असल्याचे पहावयास मिळत आहे.









