चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील स्थिती
प्रतिनिधी/ चिकोडी
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने समाजातील सर्वस्तरातील व वयोगटातील नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. गेल्या पंधरा दिवसात चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात 22 शिक्षकांचा कोरोनामुळे बळी गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे कोरोनाचे सर्वांनी गांभीर्य बाळगून कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्यावषी 18 शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दुसऱया लाटेमध्ये केवळ 15 दिवसात 22 शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यापैकी 18 जण सरकारी व चार जण अनुदानित शाळेत शिक्षक होते. चिकोडी शैक्षणिक जिल्हा कार्यक्षेत्रात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 40 शिक्षकांचा बळी गेला आहे.
अरटाळ (ता. अथणी) येथील सरकारी माध्यमिक शाळेचे श्रीशैल वाली, चिकोडी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील भानुदास शेवाळे, पट्टणकुडी येथील महालक्ष्मी माध्यमिक शाळेचे बी. एन. चौगुला, कोचरी (ता. हुक्केरी) येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक एफ. ए. इनामदार, कोहळ्ळी (ता. अथणी) येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक जावेस्ली राऊत, यमकनमर्डी सीएसएस माध्यमिक शाळेचे शिक्षक एम. आर. गस्ती, गुडगनट्टी (दड्डी) येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक अशोक पाटील, तेगिनहट्टी कन्नड शाळेचे शिक्षक गोपाल गिरियाल, अथणी येथील विनय कुलकर्णी, अरटाळ येथील कन्नड प्राथमिक शाळेचे शिक्षक एम. वाय. मांग, रायबाग येथील कन्नड प्राथमिक शाळेचे शिक्षक मुत्ताण्णा कोटी, टी. एम. देसूर, मसगुप्पी (ता. मुडलगी) येथील सरकारी शाळेचे शिक्षक के. आर. डोळ्ळी, बसणाळगड्डे (ता. चिकोडी) येथील सरकारी शाळेच्या शिक्षिका विजया कित्तुरे, जलालपूर (ता. रायबाग) येथील विवेकानंद प्राथमिक शाळेचे शिक्षक एम. एम. मतवाड, मेखळी (ता. रायबाग) येथील सरकारी कन्नड शाळेचे शिक्षक आर. वाय. जागन्नवर, नल्लानट्टी येथील कन्नड प्राथमिक शाळेच्या शिक्षिका कलावती धर्मट्टी, हळ्ळूर (ता. मुडलगी) येथील कन्नड प्राथमिक शाळेचे शिक्षक मंजुनाथ सोरगावी, मुगळखोड (ता. रायबाग) येथील कन्नड शाळेच्या शिक्षिका भारती देवन्नवर, येडूर (ता. चिकोडी) येथील सीआरपी एस. पी वड्राळे, बेटगेरी येथील कन्नड प्राथमिक शाळेच्या शिक्षिका शिवलीला मठपती, कारदगा येथील कन्नड प्राथमिक शाळेचे शिक्षक के. टी. मोरे यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
शिक्षकांनी आरोग्य सांभाळावे
चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात आठ गटशिक्षणाधिकारी क्षेत्रांचा समावेश असून शिक्षण खात्याने गेल्या पंधरा दिवसात 22 शिक्षकांना कोरोनामुळे गमावले असल्याचे दुःख शिक्षण खात्याला आहे. मृत झालेल्या शिक्षकांचा वैद्यकीय खर्च मिळवून देणे, तसेच पेन्शन, अनुकंपाच्या आधारावर कुटुंबातील एकाला नोकरी देण्याबाबत चर्चा करून त्यांना नैतिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. शिक्षकांनी आरोग्य सांभाळून रहावे. कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा करू नये, अशी सूचना केली असल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी गजानन मन्नीकेरी यांनी दिली.









