बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत करोनास्थितीचा आढावा घेत आहेत. राज्यांमधील कोरोना संदर्भातील उपाययोजना आणि समस्या जाणून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोरोना स्थितीबाबत बैठका घेत असून प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी संवाद साधला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक, पंजाब, बिहार आणि उत्तराखंडमधील मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली.
गेल्या २४ तासात कर्नाटकात ४७,५६३, बिहारमध्ये १२,९४८, पंजाबमध्ये ९,०४२ आणि उत्तराखंडमध्ये ८,३९० रुग्णांची नोंद झाली आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट स्थिती आहे. अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही राज्यांनी कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. अपुऱ्या वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांचे हाल होत असून आरोग्य यंत्रणेवरही ताण पडत आहे. देशातील या संपूर्ण परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेत आहे.