मुंबई / ऑनलाईन टीम
देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. मोदी सरकारवर यावरून टीका देखील केली जात आहे. यामुळे ट्विटरवर अनेक हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहेत. यावर बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतने तिचे मत मांडले आहे. पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान आहेत, त्यांच्यावर शंका किंवा त्यांच्या पराभवाची इच्छा करणे म्हणजे मूर्खपणाच आहे, असे अभिनेत्री कंगना राणावतने म्हटले आहे. कंगनाचे हे मत मात्र नेटकऱ्यांना पटलेले नाही. सोशल मीडियावर अनेकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
अभिनेत्री कंगनाने एक ट्वीट केले आहे ज्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ”पंतप्रधान म्हणजेच देश आहे. ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत असा विचार चुकीचा आहे. असे असेल तर मग लोकशाहीचे ढोंग का करावे?. मतदान करत एक प्रतिनिधी निवडण्यासाठी एवढा मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च का करावा? पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान आहेत. त्यांच्यावर शंका आणि किंवा त्यांच्या पराभवाची इच्छा करणे म्हणजे मूर्खपणाच आहे”, अशा आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.
कंगनाचे हे ट्वीट सुर्य प्रकाश सिंग यांना रूचलेले नाही. त्यांनी लगेच कंगनाचे ट्वीट रिट्वीट करत कंगनाला उत्तर देत म्हटले आहे की, “पंतप्रधानच देश आहे ? कंगना जी, तुमच्यासाठी जो कोणी ट्वीट लिहित आहे, त्याने ‘नागरिकशास्त्र’चे पुस्तक आठवीपर्यंतही वाचलेले नाही. लोकशाही हा शासनाचा एक प्रकार आहे, ज्यात संपूर्ण शक्ती ही जनतेच्या हातात असते, जनता अंतिम निर्णय घेते. कृपया अजून अभ्यास करा.”
थांबेल ती कंगना कसली. कंगनाने देखील सिंग यांच्या ट्वीटला उत्तर दिले आहे. तिने म्हटले आहे की, “जनतेचा निर्णय नरेंद्र दामोदर मोदी आहे. म्हणूनच ते पंतप्रधान आहेत. जो अभ्यास केल्यावर सर्व माहिती असतं पण काहीच कळत नाही अशा अभ्यासाचा काहीही उपयोग नाही. पुढच्या निवडणुकीत तुम्ही पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न करा तोपर्यंत त्यांना त्यांचं काम करु द्या.”