नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांनी शनिवारी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला. मात्र, गुरुवारी त्यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना काल चंदीगडमधील पीजीआय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळताच त्यांनी मिल्खा सिंग यांना फोन केला आणि तब्येतीची चौकशी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून मिल्खा सिंग यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना देखील केली. यासोबतच घरी परतल्यावर टोकयो ऑलम्पिकमध्ये भाग घेतलेल्या भारतीय खेळाडुंचं मनोबळ वाढवा, त्यांना मार्गदर्शन करा, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्याने मिल्खा सिंग यांना काल दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी चंदीगडमधील पीजीआय रुग्णालयातील आयसीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती रूग्णालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला मिल्खा सिंग यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मिल्खा सिंग यांनी अद्याप कोरोनाची लस घेतलेली नाही. मिल्खा सिंग यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांचा मुलगा जीव मिल्खा सिंग दुबईहून चंदीगडला आला आहे. त्याचबरोबर अमेरिकेत डॉक्टर असलेली त्यांची मुलगी मोना सिंग देखील भारतात परत आली आहे.
मिल्खा सिंग यांनी आपल्या धावण्याच्या विलक्षण शैलीने जगभर भारताला पदके मिळवून दिली आणि फ्लाइंग सिख ही उपाधी मिळवली. पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख फिल्ड मार्शल आयुब खान यांनी त्यांना हा खिताब दिला होता. आशियाई खेळांमध्ये त्यांनी 4 तर राष्ट्रकूल स्पर्धेत एक सुवर्णपद जिंकले आहे.