कॅगने ठपका ठेवल्याचा काँग्रेसचा दावा
गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची पत्रकार परिषद
मुंबई / प्रतिनिधी
महिलांना स्वयंपाक करताना धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून केंद्राने राबविलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेत तब्बल 12 लाख बोगस जोडणी देण्यात आल्याचा ठपका कॅगने ठेवल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी शनिवारी येथे केला. ही योजना फक्त दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबासाठी असताना 18 वर्षाखालील 8 लाख 59 हजार बालकांना तसेच 2 लाख पुरुषांच्या नावे जोडण्या देण्यात आल्याचे कॅगने म्हटल्याचे तिवारी यांनी सांगितले.
कॅगचा अहवाल लोकसभेत मांडण्यात आला आहे. अहवालातील माहितीनुसार केंद्र सरकारने या योजनेच्या जाहिरातीवर तब्बल 293 कोटी रुपये खर्च केले. या योजनेत भ्रष्टाचार झाला असून सरकारचे पैसे वाया जात आहेत. त्यामुळे या गैरव्यवहाराला जबाबदार कोण? असा सवालही तिवारी यांनी केला.
लाभार्थी महिलांना किमान सहा महिने मोफत किंवा सवलतीच्या दरात सिलिंडर देणे आवश्यक आहे तरच महिला धुराच्या त्रासातून मुक्त होतील. मात्र, योजना राबविणारे त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. केंद्र सरकारने या योजनेवर कोटय़वधी रुपये खर्च केले. परंतु, योजनेचा उद्देश साध्य होत नाही. यातून मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार होत आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.









