नव्या कृषी कायद्यांसंबंधी भाजपची जनजागृती मोहीम, आंदोलन तीव्र करण्याचा आंदोलकांचा निर्धार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी, अर्थात येत्या 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशातील शेतकऱयांची संवाद साधणार होणार आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या नव्या कृषीकायद्यांच्या लाभांसंबंधी ते शेतकऱयांचे प्रबोधन करणार आहेत. भाजपनेही या कायद्यांच्या समर्थनार्थ मोहीम तीव्र केली आहे. जनजागृती मोहीमेचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशात 25 हजार किसान सभांचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दुसऱया बाजूला आंदोलक शेतकरी संघटनांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. सध्या साधारणतः 60 हजार शेतकरी दिल्लीच्या सीमारेषेवर असून हे आंदोलन सलग 26 दिवस चालले आहे. आता या आंदोलनात प्रामुख्याने पंजाबचेच शेतकरी दिसून येत आहेत. या राज्यातून येत्या दोन तीन दिवसांमध्ये आणखी शेतकरी आंदोलनात समाविष्ट होतील असे सांगण्यात आले.
नवे कृषी कायदे शेतकऱयांच्या मागणीवरूनच करण्यात आले आहेत. त्यांचा उद्देश शेतकऱयांची दलालांच्या कचाटय़ातून सुटका करण्याचा आहे. या कायद्यांमुळे शेतकरी आणि ग्राहक एकमेकांच्या जवळ येणार असून दोघांचाही लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी या कायद्यांसंबंधी सकारात्मक विचार करावा,असे आवाहन पंतप्रधान मोदी आपल्या संवादात करतील अशी शक्यता आहे.
दोन मार्ग अद्यापही अंशतः बंद
जयपूर-दिल्ली महामार्ग आणि चिल्ला सीमा अद्यापही आंदोलनामुळे अंशतः बंद आहे. मात्र दिल्लीत वातावरण शांत असल्याचे सांगण्यात आले. आंदोलक शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मात्र, येत्या एक दोन दिवसांमध्ये त्यांच्याशी पुन्हा चर्चा सुरू केली जाईल, असे प्रतिपादन हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले. या वर्षअखेरच्या आत तोडगा काढण्यात यश येईल असे प्रतिपादन त्यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते.
आंदोलन राजकीय असल्याचा आरोप
सध्या सुरू असणारे शेतकरी आंदोलन हे पूर्णतः राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केला आहे. नवे कायदे शेतकऱयांच्या हिताचेच असून त्याचे प्रत्यंतर येत्या एक दोन वर्षांमध्ये येईल. आंदोलकांनी आता त्यांचे आंदोलन मागे घेऊन सरकारशी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.









