लंकेला 447 धावांचे आव्हान, श्रेयस अय्यरचेही अर्धशतक, जयविक्रमाचे 4 बळी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
रिषभ पंतने विक्रमी अर्धशतक, श्रेयस अय्यरचे जलद अर्धशतक यांच्या बळावर भारताने लंकेविरुद्ध डे-नाईट कसोटीच्या दुसऱया दिवशी 9 बाद 303 धावांवर दुसरा डाव घोषित करून लंकेला विजयासाठी 447 धावांचे कठीण आव्हान दिले. त्यानंतर दिवसअखेर लंकेने दुसऱया डावात 7 षटकांत 1 बाद 28 धावा जमविल्या होत्या. कर्णधार करुणारत्ने 10 व कुशल मेंडिस 16 धावांवर खेळत होते.
भारताचा पहिला डाव 252 धावांत आटोपल्यानंतर लंकेचा पहिला डावही बुमराहच्या भेदक माऱयासमोर 109 धावांत आटोपल्याने भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. डिनरसाठी खेळ थांबला तेव्हा भारताने दुसऱया डावात 5 बाद 199 धावा जमविल्या होत्या. पहिल्या डावात शतक हुकलेला श्रेयस अय्यर यावेळी 18 व रविंद्र जडेजा 10 धावांवर खेळत होते. नंतरच्या सत्रात भारताने जलद धावा जमवित 68.5 षटकांनंतर दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर जाहीर केला. श्रेयस अय्यरने 87 चेंडूत 67 धावा जमविताना 9 चौकार मारले. जडेजासमवेत त्याने 63 धावांची भर घातली. जडेजाने 22, अश्विनने 13, अक्षर पटेलने 9, शमीने नाबाद 16 धावा जमविल्या. लंकेच्या एम्बुल्डेनियाने 3, जयविक्रमाने 4, डिसिल्वा व फर्नांडो यांनी एकेक बळी मिळविला.
पंतचे विक्रमी अर्धशतक
त्याआधी पंतने आक्रमक फटकेबाजी करीत लंकेच्या सर्वच गोलंदाजांचा चौफेर समाचार घेत भारतातर्फे विक्रमी अर्धशतक नोंदवले. पंत खेळपट्टीवर असतो तेव्हा खेळात जान असते, हा नेहमीचा अनुभव. या डावातही त्याने हा लौकीक कायम राखला. त्याने कट, पुल, स्वीप, रिव्हर्स स्वीप, ड्राईव्ह आणि पुढे सरसावत आक्रमण करण्याचे विविध फटके मारत त्याने केवळ 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यापैकी 40 धावा या चौकार-षटकारांवर वसूल केल्या होत्या. भारतीय फलंदाजाने नोंदवलेले हे सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक ठरले असून याआधी हा विक्रम कपिलदेवने नोंदवला होता. कपिलने 1982 मध्ये पाकविरुद्ध 30 चेंडूत भारतातर्फे वेगवान अर्धशतक नोंदवले होते. पंत अर्धशतकानंतर डावखुरा स्पिनर प्रवीण जयविक्रमाच्या गोलंदाजीवर त्याच्याकडेच झेल देत बाद झाला. त्याच्या 31 चेंडूंच्या खेळीत 7 चौकार, 2 षटकारांचा समावेश होता.
दुसऱया सत्रात भारतीय फलंदाजांनी जलद धावा बनविल्या. मात्र फिरकीस अनुकूल वातावरणाचा लाभ लंकन गोलंदाजांना उठविता आला नाही. रोहित शर्मा निवडक फटके मारत होता. पण अर्धशतकासमीप असताना त्याने धनंजया डीसिल्वाला उंचावरून फटका मारला, तो थेट अँजेलो मॅथ्यूजला हात गेला. त्याच्या 79 चेंडूंच्या खेळीत 4 चौकारांचा समावेश होता. त्याने सलामीवीर मयांक अगरवालसमवेत 42 धावांची तर हनुमा विहारीसमवेत दुसऱया गडय़ासाठी 56 धावांची भागीदारी केली. अगरवालने 22 तर विहारीने 35 धावा जमविल्या. दोघांनी चांगली सुरुवात केली. पण त्याचे त्यांना मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नाही. विहारी जयविक्रमाच्या सरळ चेंडूवर त्रिफळाचीत झाला. जयविक्रमाने नंतर कोहलीलाही 13 धावांवर पायचीत केल्याने त्याच्याकडून पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला. गेल्या 73 डावांत त्याला शतकी खेळी नेंदवता आलेली नाही. बॅकफूटवर खेळताना खाली राहिलेल्या चेंडूवर तो पायचीत झाला.
बुमराहचे पाच बळी

तत्पूर्वी, पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने मायदेशात पहिल्यांदाच पाच बळी मिळविण्याचा पराक्रम केला. पाच बळी मिळविण्याची त्याची ही एकूण आठवी वेळ आहे. 6 बाद 86 या धावसंख्येवरून लंकेने पहिल्या डावाची पुढे सुरुवात केली. पण भारतीय गोलंदाजांनी त्यांचा डाव अर्ध्या तासातच झटपट गुंडाळला. बुमराह व अश्विन यांनी शेवटचे चार बळी मिळविले. बुमराहने या डावात 24 धावांत 5 तर अश्विने 30 धावांत 2 बळी मिळविले.
लंकेचे निष्प्रभ प्रदर्शन या डावातही कायम राहिले. डिकवेलाने (21) बुमराहला सलग चौकार ठोकत चांगली सुरुवात केली. पण त्यानेच पंतकरवी त्याला झेलबाद करीत पाचवा बळी मिळविला. त्याआधी बुमराहने एम्बुल्डेनियालाही एका धावेवर बाद केल्यानंतर अश्विनने कॅरमबॉलवर सुरंगा लकमलचा त्रिफळा उडविला. फर्नांडोला अश्विनने बाद करून लंकेचा डाव 109 धावांत संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक ः भारत प.डाव 252, लंका प.डाव 35.5 षटकांत सर्व बाद 109 ः डिसिल्वा 10, असालंका 5, डिकवेला 21, एम्बुल्डेनिया 1, लकमल 5, जयविक्रमा नाबाद 1, फर्नांडो 8, अवांतर 1. गोलंदाजी ः बुमराह 5-24, अश्विन 2-30, शमी 2-18, अक्षर पटेल 1-21, जडेजा 0-15. भारत दुसरा डाव 47 षटकांत 5 बाद 199 ः मयांक अगरवाल 22 (34 चेंडूत 5 चौकार), रोहित शर्मा 46 (79 चेंडूत 4 चौकार), हनुमा विहारी 35 (79 चेंडूत 4 चौकार), कोहली 13 (16 चेंडूत 1 चौकार), रिषभ पंत 50 (31 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), श्रेयस अय्यर 67 (87 चेंडूत 9 चौकार), जडेजा 22 (45 चेंडूत 3 चौकार), अश्विन 13, पटेल 9, शमी नाबाद 16 (8 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अवांतर 10. गोलंदाजी ः प्रवीण जयविक्रमा 4-78, धनंजया डिसिल्वा 1-47, एम्बुल्डेनिया 3-87, लकमल 0-34, फर्नांडो 1-48. लंका दुसरा डाव 7 षटकांत 1 बाद 28 ः करुणारत्ने खेळत आहे 10, कुशल मेंडिस खेळत आहे 16, बुमराह 1-9.









