कार्यालयांमधील एसी बंद ठेवण्याचे आवाहन
वृत्तसंस्था /चंदीगड
पंजाबमध्ये विजेचे संकट गडद होत चालले आहे. तलवंडी साबो पॉवर ग्रिडमध्ये बिघाड झाल्याने आणि कृषिकार्यांकरता विजेचा वापर वाढल्याने समस्या वाढली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये 3 दिवसांसाठी एसी आणि वीज संयंत्र (इन्व्हर्टर) बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पंजाब सरकारने वीज संकट दूर करण्यासाठी अनेक उद्योगांमध्ये दोन दिवसांची साप्ताहिक सुटी लागू केली आहे. म राज्यातील विजेची मागणी 14,500 मेगावॅटच्या पार पोहोचली आहे. याचबरोबर भटिंडा येथील तलवंडी साबो प्रकल्पातील युनिट बंद पडल्याचे पंजाब राज्य विद्युत महामंडळाने गुरुवारी म्हटले आहे.
मान्सूनला होत असलेला विलंब, कृषी लागवड आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे एक युनिट बंद पडल्याने विजेचे संकट उभे राहिले आहे. सध्या वीजेचा वापर संयमाने करण्याची गरज आहे. कार्यालयांमध्ये अनावश्यक वीजेची उपकरणे तीन दिवसांपर्यंत बंद ठेवली जावीत असे म्हटले आहे. पंजाबच्या अनेक भागांमध्ये 10 ते 15 तासांपर्यंत वीज कपात केली जात आहे. पतियाळा, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना, जालंधर आणि फिरोजपूरमध्ये अनेक तासांचे अघोषित लोडशेडिंग सुरू आहे.









