उत्तर प्रदेश तिसरा टप्पा, हिंसाचाराचे गालबोट, गोळीबारात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमधील तिसरा टप्पा आणि पंजाब राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन्ही स्थानी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. उत्तर प्रदेशात या टप्प्यात 59 तर पंजाबमध्ये 117 मतदारसंघ आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरस दिसून येत आहे.
पंजाबमध्ये 68 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. तर उत्तर प्रदेशातही 65 टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. अंतिम टक्केवारी आज सोमवारी सकाळी समजण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये मनसा मतदारसंघात सर्वाधिक 78 टक्के मतदान झाले आहे. मलेरकोटला येथे ते 76 टक्के होते. फाझिलका, संगरुर, मुक्तसर आदी मतदारसंघांमध्येही मतदान जोरदार झाले. मात्र, अमृतसर, मोहाली, लुधियाना आदी शहरी भागांमध्ये ते काहीशा कमी प्रमाणात झाले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी, आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंतसिंग मान, काँगेस नेते नवज्योत सिद्धू, माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँगेसचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजीठीया, सुखबीरसिंग बादल आदी महनीयांचे भवितव्य यंत्रबंद झाले आहे.
सोनू सूदची तक्रार
प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याची भगिनी निवडणूक लढवत आहे. मात्र तिच्या मतदारसंघातील मतदान केंद्रांवर जाऊन पाहणी करण्याची अनुमती देण्यात आली नाही, अशी तक्रार सूद याने केली. मात्र, निवडणूक अधिकाऱयांनी सूद यांचा दावा फेटाळून लावला. सूदचे वाहनही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
उत्तर प्रदेशातही उत्साह
उत्तर प्रदेशात मतदानासाठी उत्साह दिसून आला. एकंदर मतदान 65 टक्क्यांपर्यंत झाले असावे असे अनुमान आहे. याच टप्प्यात करहाल मतदारसंघात सपचे नेते अखिलेश यादव निवडणूक लढवत असून त्यांना भाजपचे मंत्री एस. पी. बघेल हे आव्हान देत आहेत. या टप्प्यात 16 जिल्हय़ांमधील 59 मतदारसंघांमध्ये मतदान झाले असून 2017 च्या निवडणुकीत यांपैकी 49 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या. तर सपला 9 आणि काँगेसला 1 जागा मिळाली होती.
सयामी जुळय़ांचेही मतदान
जन्मापासूनच एकमेकांशी जुळलेले मोहनसिंग आणि सोहनसिंग या सयामी जुळय़ानेही मतदान केले. या दोघांनीही स्वतंत्ररित्या मतदान केले. त्यांच्या मतदानासाठी अमृतसर मतदारसंघात विशेष व्यवस्था मतदानकेंद्रावर करण्यात आली होती. या जुळय़ातील दोन्ही भावांना यंदाच स्वतंत्र मतदार ओळखपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती पंजाबचे निवडणूक अधिकारी एस. राजू यांनी दिली.
भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील हथरस जिल्हय़ात सिकंद्रा राव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे महासचिव कृष्णा यादव यांची हत्या करण्यात आली आहे. ते आपल्या घरात असताना काहीजणांनी घरात शिरुन त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या घराजवळच असणाऱया मतकेंद्रावर त्यावेळी मतदान सुरु होते. या हत्येमुळे या मतदारसंघात दिवसभर तणावग्रस्त वातावरण होते. या हत्येची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला. अन्य काही स्थानी दगडफेकीचे प्रकार घडले.









