ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमधील जलालाबाद जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या उमेदवारांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यावेळी झालेल्या वादातून दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला करत दगडफेक केली.
हल्ल्यात शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या गाडीचीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबारही करण्यात आला. काँग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने केलेल्या गोळीबारात तीन कार्यकर्ते जखमी झाल्याचा आरोप अकाली दलाचे सत्येंद्र जीतसिंह मंटा यांनी केला आहे.
तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, अकाली दलाने पहिल्यांदा आमदार रवींद्रसिंह आवळा यांच्या दोन गाड्या फोडल्या. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसएसपी फाजिल्का हरजीत सिंह यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गट बाजूला केले. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली.









