मुख्यमंत्र्यांची घोषणा ः कितीही वेळा निवडणूक जिंकली तरी पेन्शन एका टर्मचीच मिळणार
चंदिगढ / वृत्तसंस्था
भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखालील आम आदमी पक्षाने आणखी एक मोठा निर्णय घेत लोकप्रतिनिधींनाच मोठा झटका दिला आहे. पंजाबममध्ये आता आमदारांना कितीही वेळा निवडणूक जिंकली तरी एका टर्मचेच निवृत्तीवेतन दिले जाणार आहे. केवळ आमदारच नाही तर त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱया पेन्शनमध्येही सुधारणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मान यांनी शुक्रवारी सांगितले. येत्या काही दिवसांत याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सेवेच्या नावाखाली आमदार राजकारणात उतरतात, तेव्हा लाखेंची पेन्शन देणे समर्थनीय नाही, असे मुख्यमंत्री भगवंत मान सांगितले. पेन्शनकपातीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका काँग्रेस आणि अकाली दलाला बसणार आहे. प्रकाशसिंग बादल, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशिवाय राजिंदर कौर भट्टल यांच्यासह अकाली दल आणि काँग्रेसचे दिग्गज नेते, ज्यांना अनेकवेळा आमदार झाल्यामुळे लाखो रुपयांची पेन्शन मिळत होती. ही पेन्शन आता बंद होऊन सर्वांना मर्यादित पेन्शन दिली जाणार असल्याने तिजोरीवरील ताण थोडाफार कमी होणार आहे.
काहींना 5.25 लाखांपर्यंत पेन्शन
आमचे आमदार हात जोडून लोकांकडे मते मागतात. बरेच लोक सेवेबद्दल बोलतात. मात्र, पेन्शनदाखल लाखो रुपये सरकारकडून मिळवत असतात. अनेक आमदारांना हरल्यानंतरही साडेतीन लाखांवरून सव्वापाच लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळत असल्यामुळे तिजोरीवर करोडो रुपयांचा बोजा पडतो. तसेच खासदार आणि आमदार या दोन्ही पदांची पेन्शन घेणारेही अनेकजण असल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. आता आमदार 2 वेळा विजयी असो वा 7 वेळा, त्यांना फक्त एकाच टर्मनुसार पेन्शन मिळेल. यासोबतच पेन्शनमधून बचत होणारे कोटय़वधी रुपये जनतेच्या हितासाठी खर्च केले जाणार आहेत. अनेक आमदारांचे कौटुंबिक निवृत्ती वेतनही खूप जास्त आहे, त्याचेही अध्ययन केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक पेन्शन
पंजाबमध्ये सर्वाधिक पेन्शन पाचवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या प्रकाशसिंह बादल यांना मिळते. त्यांना सुमारे सहा लाख रुपये पेन्शन मिळणार होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी पेन्शन घेण्यास नकार दिला होता. त्यांच्याशिवाय राजिंदर कौर भट्टल, लाल सिंग, माजी मंत्री सर्वन सिंग फिल्लौर यांना 3.25 लाख रुपये, बलविंदर सिंग भूंदर आणि पाचवेळा आमदार राहिलेल्या सुखदेव धिंडसा यांना 2.25 लाख रु. पेन्शन मिळते. त्याशिवाय त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून पगार, पेन्शन आणि भत्ते वेगळे मिळत असल्याचे दिसून येत आहे.
पंजाबवर 3 लाख कोटींचे कर्ज
पंजाबवर सध्या सुमारे 3 लाख कोटींचे कर्ज आहे. गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भगवंत मान यांनी याबाबत माहिती देत राज्याला केंद्राकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. पंजाबची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे 1 लाख कोटींचे विशेष पॅकेज मागितले आहे.









