सोनू सूदची बहिण काँगेसमध्ये सामील ः मोगामधून लढविणार निवडणूक
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाब विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे. अभिनेता सोनू सूदची बहिण मालविका सूद सच्चरने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तिने शनिवारी रात्री पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले आहे. मोगा मतदारसंघातून त्या काँग्रेसच्या उमेदवार असू शकतात. मालविका यांच्या काँग्रेसप्रवेशाची पुष्टी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी कमलजीत सिंह बराड यांनी दिली आहे.
मालविका यांच्या राजकारणातील प्रवेशाची मागील काही काळापासून चर्चा सुरू होती. मोगामधील राजकीय घडामोडींमध्ये त्या सक्रीय होत्या. परंतु त्यांनी काँग्रेसची निवड करत अन्य राजकीय पक्षांना विशेषकरून आम आदमी पक्षाला झटका दिला आहे. 38 वर्षीय मालविका मोगा शहरातील स्वतःच्या कथित सामाजिक कार्यावरून अत्यंत चर्चेत आहे.
कोरोना लॉकडाउन काळात लोकांची मदत करून खरा नायक म्हणून उदयास आलेल्या सोनू सूदची ती बहिण आहे. मालविका आणि सोनू हे स्वतःच्या दिवंगत आईवडिलांच्या स्मरणार्थ सूद चॅरिटी फौंडेशन चालवितात.
कॉम्प्युटर इंजिनियर असलेली मालविका मोगामध्ये कोचिंग सेंटर चालविते. गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजीचे मोफत कोचिंग ती उपलब्ध करते. लॉकडाउन काळात मालविकाने गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन क्लासेस चालविले होते.