प्रतिनिधी / कोल्हापूर
पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी येथील वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेस असोसिएशनच्या पदाधिकाऱयांना चर्चा करुन अडचणी समजाऊन घेतल्या. खासदार माने यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी सोमवारी ही बैठक झाली.
येथील प्रोसेस युनिट असणाऱ्या कारखानदारांना झिरो डिस्चार्ज दृष्टीने पाऊल उचलावे जेणेकरून पंचगंगा नदीत प्रोसेस युनिटच्या माध्यमातून जाणारे प्रदूषित पाणी पूर्णपणे थांबेल. त्याचबरोबर चांगल्या दर्जाच्या कापडा बरोबरच प्रदूषणमुक्त पंचगंगा नदीकडे वाटचाल करण्याचे अवाहान खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.
खासदार माने यांच्या अवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रोसेसर्स असोसिएशनने सर्व प्रोसेस युनिटच्या झिरो डिस्चार्जच्या दृष्टीने कार्यवाही करू अशी ग्वाही दिली. त्यामुळे सदर निर्णयामुळे पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले. यावेळी प्रोसेसर्स असोसिएशनने त्यांच्या उद्योगापुढे येणाया समस्या खासदार माने यांना सांगून त्या संदर्भाने या समस्या सोडविण्यासाठी मदत करण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच असोसिएशनच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन या उद्योगधंद्याचे प्रश्न सोडवणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.
यावेळी वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसर्स असोसिएशनचे अध्यक्ष गिरिराज मोहता, लक्ष्मीकांत मर्दा, संदीप मोघे, संदीप साळगावकर, श्रीनिवास बोहरा, अजित डाके, विजय मोठे, राजेश सावंत यांच्यासह सह पदाधिकारी उपस्थित होते.