महिलांनी विमान उडविणे, कार चालविणे, अगदी ट्रकही चालविणे या बाबी आता नव्या राहिलेल्या नाहीत. तथापि, उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक युवती चक्क सायकलचे पंक्चर काढण्याचे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित आहे. एवढेच नाही, तर स्वतःचे शिक्षणही ती याच उत्पन्नातून पूर्ण करत आहे. कौशल वर्धन असे या युवतीचे नाव असून तिची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

सध्या ती बीए प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. तिच्या पित्याचे पंक्चर दुकान आहे. ते स्वतः हेच काम करतात. त्यांच्याकडूनच तिने हे शिक्षण घेतले. कोणतेही काम हलके नसते, या तत्वानुसार तिने हेच काम पुढे चालविले आहे. सायकलचे पंक्चर काढण्याच्या कामात आता तिचे हात तिच्या वडीलांपेक्षाही वेगाने चालतात. या उत्पन्नावर ती संपूर्ण घराचा आर्थिक भार उचलते आणि स्वतःच्या शिक्षणाचाही खर्च सांभाळते. तिच्या या आत्मनिर्भरतेच्या ध्यासामुळे तिचे कौतुक होत आहे.
तिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यापासून तिने त्यांचे दुकान स्वतःच चालवावयास घेतले. प्रारंभी घरच्यांचा विरोध झाला. कारण हे काम महिलांनी करणे हे योग्य नाही, असे तिच्या कुटुंबियांचे मत होते. तथापि, तिने त्याकडे लक्ष न देता हा व्यवसाय सुरु ठेवला. या व्यवसायात उत्पन्न तसे फारसे नसते. तरीही घरखर्च आणि शिक्षण खर्च चालविण्याइतकी कमाई ती करु शकते.
तिची महत्वाकांक्षा मोठा उद्योग सुरु करण्याची आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता अन्य उद्योग करण्याची तिची इच्छा आहे. संगणकावर ऑटो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याची तिची महत्वाकांक्षा असून ते शिक्षणही घेण्यास तिने प्रारंभ केला आहे. तिची ही अविश्रांत धडपड आणि बुलंद आशावाद यांची दखल काही संस्थांनी घेतली असून रोशनी चॅरिटेबल ट्रस्टने कन्या सशक्तीकरण कार्यक्रमाअंतर्गत तिचा सत्कार करण्याचे आणि तिला साहाय्य करण्याचे ठरविले आहे.









