मुंबई/प्रतिनिधी
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चां होत्या. पण पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे म्हणत या प्रकरणाला पूर्णविराम दिला होता. परंतु नाराज असलेल्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाही तर समर्थक नाराज असल्याची भूमिका मांडली होती. दरम्यान, प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांनी शनिवारी आपल्या पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यात प्रथम भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. राज्यात समर्थकांचं राजीनामासत्र सुरु असतानाच पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या आहेत. यावेळी त्या भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत.
दिल्लीत दाखल झालेल्या पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची एक बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीला बैठकीत पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंकजा मुंडे भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे समर्थकांची नाराजी पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार का? हे पहावं लागणार आहे.
समर्थकांचे राजीनामे
भाजपच्या आतापर्यंत ३६ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. बीड जिल्ह्यातील राजीनाम्याचं लोण अहमदनगर, पुणे जिल्ह्यामध्येही पोहोचलं आहे. दरम्यान पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा उपाध्यक्ष यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पुण्यातील पिंपरी चिंचवड शहर ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तरात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचा कट्टर समर्थक म्हणून आपण राजीनामा दिला असं कायंदे यांनी स्पष्ट केलं.