‘प्यू रिसर्च’ या संस्थेकडून सर्व्हेअंती निरीक्षण
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आजही भारतात 80 टक्के इतकी प्रचंड आहे, असा निष्कर्ष सामाजिक सर्वेक्षणांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘प्यू रिसर्च’ या संस्थेने काढला आहे. या संस्थेने नुकतेच भारतात देशव्यापी सर्वेक्षण केले असून त्याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. सर्व सामाजिक स्तरांमध्ये ते लोकप्रिय असल्याचे या सर्वेक्षणातून निर्विवादपणे दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांविषयी आणि त्यांच्यासंबंधी भारताच्या मतदारांमध्ये भावना काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी हे व्यापक सर्वेक्षण करण्यात आले होते. लोकसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्याआधी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करण्यात आले.
केवळ 20 टक्के प्रतिकूल
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 55 टक्के मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी अत्यंत अनुकूल मत व्यक्त केले. तर 25 टक्के लोकांनी त्यांच्या कामासंबंधी आपण समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया दिली. केवळ 20 टक्के लोकांचे मत त्यांच्याविषयी प्रतिकूल दिसून आल्याचे स्पष्ट झाले.
भारताचा प्रभाव वाढला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा जगभरात प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला, असे मानणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचे दिसून आले. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्या समर्थकांच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीयच नव्हे, तर जागतिक महानायक आहेत, असे हे सर्वेक्षण सांगते.
अमेरिकेचे समर्थक अधिक
65 टक्के भारतीय नागरिकांना अमेरिका हा प्रिय देश वाटतो. तर 35 टक्के लोक रशियाच्या बाजूने असल्याचे दिसून येते. सर्वेक्षण केलेल्या 24 देशांमध्ये केवळ भारतात रशिया आणि त्या देशाचे प्रमुख व्लादिमीर पुतीन यांची लोकप्रियता जास्त आहे. चीनसंबंधी भारतीयांच्या मनात असलेल्या नाराजीत वाढ झाली आहे. दोन तृतियांशाहून अधिक भारतीयांचा चीनवर राग असल्याचे दिसून येते.