कोलकाता
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढू लागला आहे. रविवारी राज्यपालांनी राजभवनवर हेरगिरीद्वारे नजर ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. राजभवनाच्या हेरगिरीद्वारे या स्वायत्त यंत्रणेचे पावित्र्य कमी केले जात असल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षभरात विविध विषयांवर राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकारबरोबर सुरू असलेल्या संघर्षातच त्यांनी हा आरोप केल्याने दोघांमधील दुरावा वाढला आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपालांनी आमंत्रित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमालाही ममता बॅनर्जी यांनी अनुपस्थिती दर्शविल्याने संघर्षात आणखीनच भर पडली आहे.









