प. बंगालमध्ये 30, आसाममध्ये 47 मतदारसंघात मतदान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा शनिवार, 27 मार्च रोजी होणार आहे. या टप्प्यात बंगालमधील 30 आणि आसाममधील 47 मतदारसंघात मतदान होणार आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून शुक्रवारी विविध केंद्रांवर निवडणूक अधिकारी-कर्मचारी रवाना झाले. या पहिल्याच टप्प्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आली आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱयांनी काही संवेदनशील भागांचा दौरा करत मतदान केंद्रांची पाहणी करत काही सूचनाही केल्या.
पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात मार्च-एप्रिल महिन्यात निवडणुका होत आहेत. मागील महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानसभेच्या 824 जागांसाठी मतदान होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच मतदान करण्यासाठी एक तासाचा वेळही वाढवून देण्यात आला आहे. देशभरात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, दुसरीकडे या विधानसभा निवडणुका होत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान
पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तब्बल आठ टप्प्यात होणार आहे. यानुसार पहिला टप्प्यातील मतदान 27 मार्च (30 मतदारसंघ), दुसरा टप्पा 1 एप्रिल (30 मतदारसंघ), तिसरा टप्पा 6 एप्रिल (31 मतदारसंघ), चौथा टप्पा 10 एप्रिल (44 मतदारसंघ), पाचवा टप्पा 17 एप्रिल (45 मतदारसंघ), सहावा टप्पा 22 एप्रिल (43 मतदारसंघ), सातवा टप्पा 26 एप्रिल (36 मतदारसंघ) आणि आठवा टप्पा 29 एप्रिल (35 मतदारसंघ) रोजी होणार आहे.
आसाममध्ये तीन टप्प्यात
आसाममध्ये विधानसभेच्या एकूण 126 जागा असून राज्यात तीन टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. पहिला टप्पा 27 मार्च रोजी होणार असून 47 मतदारसंघात मतदान होईल. त्यानंतर 1 एप्रिल रोजी दुसऱया टप्प्यासाठी 39 मतदारसंघात आणि 6 एप्रिल रोजी तिसऱया टप्प्यासाठी 40 मतदारसंघात मतदान होणार आहे.









