डिचोली/प्रतिनिधी :
न्हावेली-सांखळी येथे निर्जनस्थळी झाडीत एका मजूर कंत्राटदाराचा मृतदेह आढळून आला असून सदर प्रकरण खुनाचे असल्याने त्या दिशेने पोलीस तपासाला प्रारंभ करण्यात आला आहे. सदर मृतदेहाचे तीन ठिकाणी विविध अवयव आढळून आले असल्याने ही घटना पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच उत्तर गोवा पोलीस अधिक्षक उत्कृष्ट प्रसुन्न व डिचोली पोलीस उपअधीक्षक गुरुदास गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
उपलब्ध माहितीनुसार सांखळी येथे राहणारा मूळ पश्चिम बंगाल येथील जमेदार रेहमान (वय 30) हा गेल्या 15 सप्टें. पासून घरातून बेपत्ता होता. त्याच्या भावाने तशा प्रकारची तक्रार डिचोली पोलीस स्थानकात नोंदवली होती. या प्रकरणी पोलीस शोध तसेच घरच्या मंडळीकडूनही शोधकार्य सुरू असतानाच शनिवारी 19 रोजी संध्याकाळी न्हावेली-सांखळी गावातील एक निर्जनस्थळी झाडीत एक अज्ञाताचा मृतदेह एका मजूराला दृष्टीस पडला.
मृतदेह सडलेल्या अवस्थेत
सदर मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून विविध ठिकाणी फेकून दिल्याचे निदर्शनास आले आहे. सदर मृतदेह संपूर्ण सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मृतदेहाचे अवयव तुकडे करून अस्ताव्यस्त फेकण्यात आले आहेत की सडल्यानंतर कोणी जनावरांनी ओढून नेत मृतदेहाचे अवयव अस्ताव्यस्त टाकले आहेत, याबाबत शंका आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सदर बाब स्पष्ट होणार आहे.
न्हावेली येथे झाडीत मृतदेह आढळून आल्याचे कळताच डिचोली पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी पोलीस कर्मचाऱयांसह न्हावेली येथे धाव घेतली. सदर घटनेची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसुन्न यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक गुरुदास गावडे यांचीही उपस्थिती होती. अधीक्षक प्रसुन्न यांनी डिचोली पोलिसांना विशेष सूचना दिल्या. घटनास्थळी पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे गोमेकॉत पाठविण्यात आला.









