भारत-न्यूझीलंड तिसरी टी-20 लढत आज, सलग दोन विजयानंतर विराटसेना मालिकाविजयासाठी महत्त्वाकांक्षी
हॅमिल्टन / वृत्तसंस्था
पहिले दोन्ही सामने ओळीने जिंकल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडच्या भूमीत आपली पहिलीवहिली टी-20 मालिकाविजय संपादन करण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही संघात 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज होत असून यजमान संघाने अगदीच ठसठशीत खेळ साकारला तरच त्यांना मालिकेतील अस्तित्व कायम राखता येईल, हे स्पष्ट आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 12.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
भारताने यापूर्वी ऑकलंड येथे झालेल्या पहिल्या दोन लढतीत अनुक्रमे 6 व 7 गडी राखून दमदार विजय संपादन केला आणि 2-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेत मालिकाविजयाच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले. आता सेडॉन पार्कवरील ही लढत जिंकत 3-0 अशा विजयावर शिक्कामोर्तब करण्याचा विराटसेनेचा अर्थातच प्रयत्न असणार आहे.
भारताने यापूर्वी न्यूझीलंडमध्ये दोन टी-20 मालिका खेळल्या असून त्या दोन्हीत पराभव स्वीकारले आहेत. 2019 वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर आतापर्यंत झालेल्या पाच टी-20 मालिकांमध्ये भारतीय संघ अपराजित राहिला आहे. यात न्यूझीलंडविरुद्ध मागील दोन लढतींचाही समावेश आहे. फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची मालिका भारताला जिंकता आली नव्हती. त्यात उभय संघात 1-1 अशी बरोबरी झाली होती.
अर्थात, न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका जिंकली तरी टी-20 मानांकनात यामुळे फारसे व्यापक फेरबदल होणे शक्य नाही, असे स्पष्ट संकेत आहेत. भारताने उर्वरित तिन्ही सामने जिंकत 5-0 अशी धूळ चारली तरी ते सध्याच्या पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी पोहोचू शकतील. न्यूझीलंडचा संघ सहाव्या स्थानी असून मानांकन यादीत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका अनुक्रमे पहिल्या चार स्थानी आहेत. तरी, ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाला वेळीच सूर सापडत असल्याने भारतीय संघव्यवस्थापनासाठी ही स्वागतार्ह बाब ठरते आहे.
विशेषतः केएल राहुल व श्रेयस अय्यर या युवा खेळाडूंनी केलेली प्रगती लक्षवेधी ठरली आहे. आजच्या तिसऱया टी-20 लढतीत भारतीय संघात बदल संभवत नाहीत. कर्णधार विराट कोहली, केएल राहुल, यजुवेंद्र चहल, शमी सराव सत्रात खेळले.
ग्रँडहोमला शेवटची संधी
न्यूझीलंडच्या दृष्टीने कॉलिन डे ग्रँडहोमसाठी आज शेवटची संधी असेल. यानंतर उर्वरित दोन टी-20 सामन्यात ग्रँडहोमच्या जागी फलंदाज टॉम ब्रुस घेणार आहे. ग्रँडहोम सध्या फक्त फलंदाज या नात्याने संघात आहे. पण, पहिल्या दोन्ही लढतीत अनुक्रमे 0 व 3 धावांसह त्याने सपशेल निराशा केली. यजमान संघासमोर बुमराहला कसे रोखायचे, हाच खरा प्रश्न आहे. न्यूझीलंडने ईडन पार्कवर दोन्ही सामन्यात निराशा केली असली तरी सेडॉन पार्कवर त्यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. आजतागायत इथे खेळलेल्या 9 पैकी 7 सामन्यात त्यांनी विजय संपादन केले आहेत आणि हेच त्यांचे आजचे मुख्य आशास्थान असणार आहे.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टील, रॉस टेलर, स्कॉट कग्लेईन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डे ग्रँडहोम, टॉम ब्रुस, डॅरेल मिशेल, मिशेल सॅन्टनर, टीम सेफर्ट (यष्टीरक्षक), हमिश बेनेट, ईश सोधी, टीम साऊदी, ब्लेयर टिकनर.
सामन्याची वेळ : दुपारी 12.30 पासून.
कोटस
भारतीय संघ सातत्याने विदेशातही सरस आणि सरस खेळत आला असून सध्याची टी-20 मालिका हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पहिल्या दोन लढती ऑकलंडमध्ये झाल्यानंतर हॅमिल्टनमध्ये तिसरी लढत होईल. याचा लाभ घेण्याचा आमचा प्रयत्न असेल.
-न्यूझीलंडचा आघाडीचा जलद गोलंदाज टीम साऊदी.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आम्ही आमचे खेळाडू जवळपास निश्चित केले आहेत. दुखापतीची किंवा खराब फॉर्मची समस्या नसल्यास आम्ही सध्या निश्चित केलेला संघच त्या स्पर्धेत खेळेल.
-भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड
चहल म्हणतो, बसमध्येही जाणवते धोनीची उणीव!
त्याच्या जागेवर कोणीच बसत नाही
भारतीय संघाला धोनीची उणीव सातत्याने जाणवते. संघासमवेत प्रवास करताना धोनीची बसमधील जागा ठरलेली असायची. तो त्याच जागेवर बसायचा. आमच्यापैकी कोणीही त्या जागेवर आता बसत नाही. ती जागा आम्ही रिकामी ठेवतो, अशा शब्दात यजुवेंद्र चहलने भारतीय संघाला धोनीची कशी उणीव जाणवते, हे स्पष्ट केले.
भारतीय संघ तिसऱया टी-20 सामन्यासाठी बसने हॅमिल्टनकडे प्रवास करत असताना चित्रित व्हीडिओत चहलने जसप्रित बुमराह, ऋषभ पंत व केएल राहुल यांच्याशी संवाद साधला. या व्हीडिओच्या शेवटच्या टप्प्यात चहल बसच्या दर्शनी भागाकडे पोहोचला आणि एका रिकाम्या आसनाकडे अंगुलीनिर्देश करत तो म्हणाला, ‘ये वो सीट है, जहा एक लिजेंड बैठते थे. माही भाई. अभी भी यहाँ कोई नही बैठकता. हम उन्हे बहोत मिस करते है’!









