वृत्तसंस्था/ ढाका
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा आगामी बांगलादेश दौरा कोरोना महामारी परिस्थितीमुळे लांबणीवर टाकल्याची माहिती मंगळवारी बांगलादेश क्रिकेट मंडळाने दिली आहे.
केन विलीयम्सच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी बांगलादेशमध्ये येणार होता. पण बांगलादेशमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळानी या आगामी मालिकेसाठी सुलभ कालावधी ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 च्या ऑगस्टमध्ये ही पूर्ण क्रिकेट मालिका भरविण्याचे कोरोना परिस्थितीमुळे बांगलादेश क्रिकेट मंडळासमोर मोठे आव्हान राहील, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे प्रमुख कार्यकारी निजामउद्दीन यांनी सांगितले.
कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर क्रिकेटपेक्षा खेळाडूंच्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देताना आम्ही ही मालिका नियोजित कालावधीत घेण्याचा धोका पत्करणार नाही, असे त्यांनी म्हटले. बांगलादेशचा माजी कर्णधार मुर्तझा तसेच नझमूल इस्लाम आणि नफिस इक्बाल यांना कोरोनाची बाधा झाल्याचे बांगलादेश क्रिकेट मंडळाने म्हटले आहे.









