वृत्त संस्था/ दुबई
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी गट-2 मधील सामन्यात न्यूझीलंडचा संघ स्कॉटलंड संघावर विजय मिळवून उपांत्य फेरीसाठी आपले स्थान अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करेल.
या स्पर्धेत पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दुसऱया सामन्यात न्यूझीलंडने आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर भारताचा 8 गडय़ांनी पराभव केला. या स्पर्धेच्या शेवटच्या चार संघात स्थान मिळविण्यासाठी न्यूझीलंड संघाला प्राथमिक फेरीतील उर्वरित तीन सामने जिंकणे जरूरीचे आहे. दुबळय़ा स्कॉटलंड आणि नामिबिया संघाविरूद्ध न्यूझीलंडचा संघ मोठय़ा फरकाने विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. पण अफगाणविरुद्ध सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी झगडावे लागू शकते. भारताविरूद्ध न्यूझीलंड संघातील फिरकी गोलंदाज सोधी आणि सँटेनेर प्रभावी ठरले होते. त्याचप्रमाणे फलंदाजीत मिचेल, कर्णधार विल्यम्सन, गप्टील यांची कामगिरी दर्जेदार होणे आवश्यक आहे. स्कॉटलंड संघाचे नेतृत्व कोत्झर करीत आहे. बुधवारी या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होणार असून नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा राहील. या स्पर्धेत आतापर्यंत नाणेफेक जिंकणाऱया संघांनी अधिक विजय नोंदविले आहेत.









