वृत्तसंस्था/ लंडन
न्यूझीलंडच्या कसोटी संघातील बहुतांशी क्रिकेटपटूंचे रविवारी लंडनमध्ये आगमन झाले. यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका त्याचप्रमाणे आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेतील भारताविरूद्धच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज झाला आहे.
न्यूझीलंडचे क्रिकेटपटू ऑकलंडहून सिंगापूरमार्गे लंडनमध्ये रविवारी दाखल झाले. त्यानंतर त्यांचे आता साऊदम्पटनमधील एजेस बाऊल येथे या दौऱयातील पहिल्या दोन आठवडय़ासाठी वास्तव्य राहील. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी 2 जूनला लंडनमध्ये तर दुसरी कसोटी बर्मिंगहॅम येथे 10 जूनपासून खेळविली जाणार आहे. विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत 18 जूनपासून साऊदम्पटन येथे सुरू होणार आहे.
कोरोना महामारी संदर्भातील सर्व नियमांचे काटेकार पालन न्यूझीलंड संघाने अवलंबले आहे. इंग्लंडला जाण्यापूर्वी न्यूझीलंडच्या सर्व क्रिकेटपटूंची लसीकरण आणि कोरोना चाचणी घेण्यात आली. न्यूझीलंडच्या प्रत्येक क्रिकेटपटूसमवेत वैद्यकीय बॅग असून त्यामध्ये मास्क आणि सॅनिटायझर यांचा समावेश आहे. आता न्यूझीलंडचे खेळाडू तीन दिवस हॉटेल रूममध्ये आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. न्यूझीलंडच्या खेळाडूंसाठी चार ते सहा दिवसांसाठी गटागटाने सराव शिबीर राहील. त्यानंतर या खेळाडूंची पुन्हा कोरोना चाचणी घेतली जाईल. या प्रक्रियेनंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंमध्ये 26 ते 28 मे दरम्यान तीन दिवसांचा सरावाचा सामना आयोजित केला आहे. या सामन्यासाठी स्थानिक सहा गोलंदाजांचा समावेश राहील. स्थानिक गोलंदाजांना यापूर्वी आयसोलेट केले आहे.
न्यूझीलंड संघातील खेळाडू साऊदी, वॅटलिंग, रॉस टेलर आणि वॅग्नर हे सोमवारी ऑकलंडहून लंडनला प्रयाण करतील. त्यानंतर ते साऊदम्पटनमध्ये दाखल होतील. कर्णधार विल्यम्सन, जेमिसन, सँटनर, संघाचे फिजीओ सिमसेक आणि ट्रेनर ख्रिस डोनाल्डसन यांचे सोमवारी उशिरा लंडनमध्ये आगमन होईल. न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाज बोल्टचा आयसोलेशन कालावधी रविवारी संपला असून तो आता आपल्या कुटुंबियाला भेटण्यासाठी माऊंट माँगेनुई येथे परतणार आहे. त्यानंतर तो लंडनला प्रयाण करेल, असे क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने सांगितले.









