303 धावांना प्रत्युत्तर देताना चहापानाअखेर न्यूझीलंड 1 बाद 130
बर्मिंगहम / वृत्तसंस्था
यजमान इंग्लंडचा पहिला डाव सर्वबाद 303 धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने येथील दुसऱया कसोटी सामन्याच्या दुसऱया दिवशी चहापानाअखेर 1 बाद 130 धावा जमवल्या होत्या. चहापानासाठी खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी डेव्हॉन कॉनवे 78 तर विल यंग 40 धावांवर नाबाद राहिले.
इंग्लंडने शुक्रवारी 7 बाद 258 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केली. मात्र, त्यांचे उर्वरित 3 फलंदाज आणखी केवळ 45 धावांची भर घालू शकले. डॅन लॉरेन्स 223 चेंडूत 13 चौकारांसह 81 धावांवर नाबाद राहिला. किवीज संघातर्फे आघाडीचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टने 29 षटकात 85 धावात 4 बळी घेतले तर मॅट हेन्रीने 26 षटकात 78 धावात 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय, फिरकीपटू एजाझ पटेलने 34 धावात 2 मोहरे टिपले. नील वॅग्नरला 68 धावात 1 बळी घेता आला.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा कर्णधार व सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम अवघ्या 6 धावांवर परतल्याने पाहुण्या संघाला पहिला धक्का सोसावा लागला. ब्रॉडने त्याला पायचीत केले. मात्र, शुक्रवारी पहिल्या सत्रात इंग्लिश गोलंदाजांना एकही गडी मिळवता आला नाही. पहिल्या कसोटी सामन्यातील द्विशतकवीर डेव्हॉन कॉनवेने 135 चेंडूत 12 चौकारांसह 78 तर विल यंगने 107 चेंडूत 6 चौकारांसह 40 धावा जमवत दुसऱया गडय़ासाठी 115 धावांची भागीदारी साकारली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 303 (डॅन लॉरेन्स 223 चेंडूत 13 चौकारांसह नाबाद 81, रोरी बर्न्स 187 चेंडूत 10 चौकारांसह 81, मार्क वूड 80 चेंडूत 7 चौकारांसह 41. अवांतर 18. किवीज संघातर्फे ट्रेंट बोल्ट 4-85, मॅट हेन्री 3-78, एजाझ पटेल 2-34, नील वॅग्नर 1-68). न्यूझीलंड पहिला डाव ः 43 षटकात 1 बाद 130. (डेव्हॉन कॉनवे नाबाद 78, विल यंग नाबाद 40. स्टुअर्ट ब्रॉड 1-15). (धावफलक चहापानापर्यंत)









