ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
हाथरस येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागत असून, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकारणासाठी हाथरसला जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे इराणी यांनी म्हटले आहे.
स्मृती इराणी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘जनतेला माहीत आहे, राहुल गांधी हाथरसला जाण्याचा का प्रयत्न करत आहेत. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी नाही तर या प्रकरणाचे राजकारण करण्यासाठी त्यांना हाथरसला जायचे आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी आज सकाळी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, ‘पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना उत्तरप्रदेश सरकार आणि पोलिसांनी दिलेली वागणूक व्यवहार्य नाही. मला ते मान्य नाही आणि कोणत्याही भारतीयाला ते मान्य असू नये’.
याशिवाय राहुल गांधींनी आणखी एक ट्विट करून लिहिले आहे की, ‘जगातील कोणतीही शक्ती मला पीडितेच्या दुःखी कुटुंबाला भेटण्यापासून आणि त्यांचे दुःख वाटून घेण्यापासून रोखू शकत नाही.’