कुडाळ येथे ‘पेन्शनर्स डे’ साजरा
वार्ताहर / कुडाळ:
तत्कालीन अधिकारी-कर्मचारी यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन जो अभूतपूर्व असा न्यायालयीन लढा उभारला, त्यामुळेच पेन्शन हा हक्क प्रस्थापित होऊन भारतीय संविधानात तशी तरतूद करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे कोकण विभागीय अध्यक्ष मनोहर आंबेकर यांनी ‘पेन्शनर्स-डे’ कार्यक्रमात येथे सांगितले. ‘17 डिसेंबर’ हा दिवस संपूर्ण भारतात ‘पेन्शनर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. कुडाळ तालुका शाखेतर्फे ‘पेन्शनर्स डे’ येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश पेडणेकर, कार्याध्यक्ष शरद कांबळी, सल्लागार चंद्रकांत अणावकर, सचिव उदय कुडाळकर, तालुकाध्यक्ष रासम, नगरसेविका उषा आठले, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव चंद्रकांत पाटकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनने सहाव्या वेतन आयोगातील पेन्शन त्रुटी, 1 जुलै 1972 नंतर सेवेत दाखल झालेल्या अनटेन्ड प्राथमिक शिक्षकांचा पेन्शन प्रश्नावर संघटनेने न्यायालयात जाऊन संघर्ष करून न्याय मिळविला, असे शरद कांबळी यांनी सांगितले, तर चंद्रकांत अणावकर यांनी पेन्शन हा हक्क प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या चळवळीचा इतिहास कथन केला. सुरेश पेडणेकर, मनोहर आंबेकर, शरद कांबळी, चंद्रकांत अणावकर, उदय कुडाळकर यांनी झालेल्या चर्चेदरम्यान जि. प. प्रशासनाच्या नियमबाहय़ कार्यपद्धतीमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱयांना अतिविलंबाने दिली जाणारी पेन्शन, प्रशासनाने जटील बनवलेला शिक्षकांचा निवडश्रेणी प्रश्न, पेन्शन अदालत, सेवानिवृत्त शिक्षकांना विलंबाने दिला जाणारा भविष्य निर्वाह निधी व गटविमा लाभ याबद्दल नाराजी व्यक्त केली. या संदर्भात मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत निवेदने पाठविण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला.
27 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या जिल्हा पेन्शनर्स डे व वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळकर यांनी केले. प्रास्ताविक रासम, तर आभार श्रीमती नार्वेकर यांनी मानले.









