प्रतिनिधी / ओरोस:
न्यायालयात दाखल होणारी कागदपत्रेही आता 36 तास विलगीकरणात राहणार आहेत. त्यानंतरच त्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. न्यायालयीन कामकाज सुरू करण्यात आले असले, तरी पक्षकारांना न्यायालयात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दिवसभरात दोन सत्रात कामकाज चालणार असून एकाच दरवाजातून ये-जा करता येणार आहे. नागरिकांनी निर्बंधांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा न्यायालय प्रशासनाकडून करण्यात आले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मागील सुमारे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत बंद ठेवण्यात आलेले न्यायलयांचे कामकाज 8 जून पासून सुरू करण्यात आले आहे. जिल्हा व तालुका न्यायलयांचे कामकाज सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत चालणार आहे. ज्या न्यायालयांमध्ये एकच न्यायाधीश कार्यरत आहेत, त्याठिकाणी सकाळच्या सत्रात कामकाज केले जाणार आहे. प्रकरणे दाखल करण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 1 आणि दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 अशी वेळ निर्धारित करण्यात आली आहे.
यावेळी चालणाऱया खटल्यादरम्यान प्रकरणातील वकिलांव्यतिरिक्त पक्षकारांना न्यायालयात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यावेळी न्यायालयात प्रवेश करण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा राहणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.









